देशातील पहिल्या ग्राहक प्रबोधन केंद्राचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याहस्ते उद्घाटन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

नाशिक, दि. ३० मे : नाशिकमध्ये देशातील पहिले ग्राहक प्रबोधन केंद्र सुरु झाले असून ही बाब नक्कीच नाशिक शहर जिल्ह्यासाठी अभिमानाची आहे. तसेच या ग्राहक प्रबोधन केंद्राच्या माध्यमातून ग्राहकांना त्यांचे हक्क व कायद्याची माहिती होणार असून जागृकता वाढणार आहे, असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले.

वैधमापन शास्त्र विभाग, महानगर पालिका व नाशिक फर्स्ट यांच्या संयुक्त विद्यमाने ट्रॅफिक पार्क, मुंबई नाका या संस्थेच्या आवारात कायमस्वरुपी देशातील पहिले ग्राहक प्रबोधन केंद्राचे उद्घाटन पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी वैध मापनशास्त्र यंत्रणेचे नियंत्रक डॉ. रवींद्रकुमार सिंगल, वैद्यमापन शास्त्र विभाग नाशिकचे सहनियंत्रक नरेंद्र सिंह, उपनियंत्रक जयंत राजदेरकर, बाळासाहेब जाधव, नाशिक फर्स्टचे चेअरमन अभय कुलकर्णी, संचालक सुरेश पटेल व ग्राहक पंचायत समितीचे अध्यक्ष सुधीर काटकर उपस्थित होते.

पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले की, ग्राहकांच्या तक्रारी नेहमी येत असतात. ग्राहक नेहमी फसविला जात असतो. त्यामुळे प्रत्येक ग्राहकाचे प्रबोधन होणे आवश्यक आहे. जेणेकरुन ग्राहकांच्या फसवणूकीला आळा बसेल. ग्राहक प्रबोधन केंद्राच्या माध्यमातून जास्तीत जास्त ग्राहक जोडले जाऊन त्यांचे प्रबोधन करण्यासाठी प्रचार व प्रसिद्धीचे कार्यक्रम राबविले जावेत, अशी अपेक्षाही भुजबळ यांनी यावेळी व्यक्त केली आहे.

शिक्षित असणाऱ्या व्यक्तीबाबत फसवणुकीचे प्रकार कमी होतात. त्यामुळे शालेय जीवनापासून मुलांच्या पाठयपुस्तकात ट्राफिक आणि ग्राहक प्रबोधनाच्या माहितीचा समावेश करण्यात यावा. त्यामुळे शिक्षण घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला शालेय जीवनापासून वाहतूक नियमांचे व ग्राहक हक्क व कायद्याची माहिती होईल. तसेच असे ग्राहक प्रबोधन केंद्र राज्यातील प्रत्येक विभागात सुरु करावेत. त्यानंतर जिल्हा स्तरावर ग्राहक प्रबोधन केंद्र उभारण्यात यावेत, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

महाराष्ट्रात अपघाताचे प्रमाण अधिक आहे. बऱ्याचदा वाहन चालविणाऱ्यांना नियमांची पुरेशी माहिती नसते, त्यामुळे या ट्राफीक पार्कच्या माध्यमातून अवजड वाहनांचे वाहनचालक व इतर वाहने चालविणाऱ्यांसाठी प्रशिक्षण शिबीर राबविण्यात यावे. तसेच भेसळ करणाऱ्या व्यावसायिकांवर कारवाई करण्यात यावी. पेट्रोल डिझेलमध्ये सध्या बायो डिझेलच्या नावाखाली मोठी फसवणूक होते. त्यांच्यावर कडक कार्यवाही करण्यात येत असल्याचे यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.

हे देखील वाचा : 

स्वप्न साकार करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा जिद्द, संयम, इच्छाशक्ती ही अस्त्रे प्रत्येकात असणे आवश्यक – उद्योजक भरत धोटे

ऐकावं ते नवलच ! बायकोनं दुसऱ्याशी लग्न केले, तिच्यावर कारवाई करा, चक्क नवरा बसला बायकोच्या विरोधात उपोषणाला.

 

lead news