दक्षिण गडचिरोलीत बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट; आदिवासींच्या जिवाशी खेळ

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली : अतिदुर्गम आणि आदिवासीबहुल जिमलगट्टा परिसरात कोणत्याही अधिकृत वैद्यकीय पदवीविना सर्रास दवाखाने थाटून रुग्णांवर उपचार करणाऱ्या बोगस डॉक्टरांचे जाळे सक्रिय झाले आहे. शासकीय आरोग्य यंत्रणेच्या मर्यादा आणि दुर्गमतेचा गैरफायदा घेत गोरगरीब जनतेच्या जिवाशी उघडपणे खेळ सुरू असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला असून, या प्रकाराची तातडीने सखोल चौकशी करून कठोर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.

जिमलगट्टा आणि परिसरातील खेड्यापाड्यांमध्ये पश्चिम बंगाल तसेच तेलंगणा भागातून आलेल्या काही व्यक्तींनी अनधिकृतपणे वैद्यकीय व्यवसाय सुरू केला आहे. या व्यक्तींकडे वैद्यकीय सेवेसाठी लागणारे कोणतेही अधिकृत शिक्षण, कौन्सिलची नोंदणी अथवा प्रशासनाचा परवाना नसतानाही त्या स्वतःला डॉक्टर भासवून रुग्णांची दिशाभूल करत आहेत.

दुर्गम भागात प्राथमिक आरोग्य केंद्रांचे अंतर जास्त असल्याने आणि वेळेवर शासकीय वैद्यकीय मदत मिळण्यात अडचणी येत असल्याने, अगतिक आदिवासी बांधव नाईलाजाने या कथित डॉक्टरांकडे धाव घेतात. याचाच गैरफायदा घेऊन हे तोतया डॉक्टर आजाराचे कोणतेही अचूक निदान न करता रुग्णांना अंदाजे औषधे देतात, तसेच औषधांची अव्वाच्या सव्वा दराने विक्री करून आर्थिक लूट करत असल्याच्या तक्रारी स्थानिकांनी केल्या आहेत. चुकीच्या उपचारांमुळे रुग्णांच्या आरोग्यावर गंभीर व दीर्घकालीन दुष्परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

या संपूर्ण प्रकरणाची आरोग्य आणि पोलीस प्रशासनाने तातडीने प्रत्यक्ष पाहणी करावी, जिमलगट्टा परिसरातील अशा संशयास्पद दवाखान्यांची झाडाझडती घेऊन संबंधितांची कागदपत्रे व औषधसाठा तपासावा आणि दोषी आढळणाऱ्यांवर गुन्हे दाखल करून असे अनधिकृत दवाखाने कायमस्वरूपी बंद करावेत, अशी ठाम मागणी परिसरातील संतप्त नागरिकांकडून केली जात आहे.

Fack doctor in Gadchiroli
Comments (0)
Add Comment