भारताची फाळणी ही देशाच्या इतिहासातील अत्यंत वेदनादायक घटना : तुषार दुधबावरे

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

धानोरा : १४ ऑगस्ट हा दिवस केवळ स्वातंत्र्याच्या पूर्वसंध्येचा दिवस नसून, भारताच्या फाळणीच्या वेदनादायी आठवणी जागवणारा दिवस आहे. १९४७ मध्ये देशाची फाळणी झाली. या फाळणीमुळे लाखो नागरिकांना विस्थापित व्हावे लागले, अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली आणि मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली. त्यामुळे भारताची फाळणी ही देशाच्या इतिहासातील अत्यंत वेदनादायक घटना असल्याचे प्रतिपादन युवा व्याख्याते व स्तंभलेखक तुषार दुधबावरे यांनी केले.

 

अॅड. मंगल प्रभात लोढा, कॅबिनेट मंत्री, कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालय, महाराष्ट्र राज्य यांच्या संकल्पनेतून ‘विभाजन विभीषिका स्मृती दिना’निमित्त टिपागड गुरुबाबा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, धानोरा येथे आयोजित कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते.

दुधबावरे म्हणाले, “१५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला; मात्र त्याच्या आदल्या दिवशी भारतीय उपखंडाच्या इतिहासात फाळणीची अत्यंत वेदनादायी घटना घडली. फाळणीदरम्यान पंजाब, बंगालसह विविध भागांत मोठ्या प्रमाणावर हिंसाचार झाला. अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली, मुलांनी आई-वडिलांना गमावले, तर अनेक महिलांवर अमानुष अत्याचार झाले. कोट्यवधी नागरिकांचे विस्थापन झाले आणि मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली.”

फाळणी ही केवळ राजकीय सीमा आखण्याची घटना नव्हती, तर ती एक मोठी मानवी शोकांतिका होती, असेही त्यांनी सांगितले. दरवर्षी १४ ऑगस्ट रोजी ‘विभाजन विभीषिका स्मृती दिन’ पाळून या काळातील वेदना, संघर्ष आणि विस्थापितांच्या त्यागाचे स्मरण केले जाते. केंद्र व राज्य शासनाच्या कौशल्य विकास विभागांतर्गत येणाऱ्या औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) तसेच इतर शैक्षणिक संस्थांमध्ये यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आयटीआयचे प्राचार्य मधूपवार होते. यावेळी बोलताना त्यांनी, “देशाची सीमा कागदावर आखली गेली; मात्र त्या एका रेषेने केवळ जमीन विभागली नाही, तर कुटुंबे, गावे, शेती आणि असंख्य आठवणीही विभागल्या,” असे सांगितले.

केंद्र सरकारच्या नव्या मार्गदर्शन तत्त्वानुसार कार्यक्रमाची सुरुवात ‘वंदे मातरम्’ या राष्ट्रीय गीताने, तर सांगता ‘जन गण मन’ या राष्ट्रगीताने करण्यात आली.

यावेळी निदेशिका मनीषा बंडराखे, निदेशिका धुरात, निदेशक आशिष म्हशाखेत्री, निदेशक सौरभ मेश्राम, निदेशक प्रीतम येटेवार, निदेशक पिंटू उसेंडी यांच्यासह शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निदेशिका कु. गायत्री हिंगवे यांनी केले.

Comments (0)
Add Comment