तरुणांना स्टंटबाजी नडली! सुदैवाने जीव वाचला..

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

मनोज सातवी, 

पालघर दि,१४ : पालघरच्या डहाणू तालुक्यातील चिंचणी समुद्रकिनारी स्टंटबाजी करताना अर्टिगा कारचा टायर फुटल्याने कारचा भीषण अपघात झाला आहे.या अपघातात जीवित हानी झालेली नसली तरी कार मधील तरुण किरकोळ जखमी झाले आहेत. मात्र अशा प्रकारे स्टंटबाजी करून स्वतःसह इतरांच्या ही जीवाला धोका निर्माण करणाऱ्या या स्टंटबाज तरुणांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे. दरम्यान, अपघात होताच तीन तरुणांनी घटनास्थळावरून पळ काढला तर उरलेल्या दोघांना स्थानिकांनी बाहेर काढले.

निसर्गरम्य अशा चिंचणी समुद्रकिनाऱ्यावर स्टंटबाज तरुणांनी हैदोस घातला आहे. आज संध्याकाळी एका अर्टिगा कार मधून पाच तरुणांनी या समुद्रकिनाऱ्यावर स्टंटबाजी सुरू केली होती. मात्र यावेळी अचानक गाडीचा टायर फुटल्याने गाडी पलटली.

या अपघातात कार मधील पाच तरुण प्रवासी कीरकोळ जखमी झाले आहेत. यावेळी कारमधील तीन तरुणांनी घटनास्थळावरून पोबारा केला तर कार मध्ये अडकलेल्या दोन तरुणांना स्थानिक नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन कारमधून बाहेर काढले आणि कार सुस्थितीत केली.

अपघात घडला त्यावेळी जर कार समोर इतर पर्यटक किंवा नागरिक आले असते तर मोठी दुर्घटना घडली असती अशी माहिती स्थानिकांनी दिली आहे. त्यामुळे अशा स्टंटबाजांना अद्दल घडविण्यासाठी त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे.

दरम्यान या घटनेची माहिती मिळताच, वाणगाव पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. तसेच या प्रकरणी स्टंटबाज तरुणांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

 

जिल्हाधिकारी पालघरपोलीस अधीक्षक पालघरपोलीस स्टेशन पालघरवाणगाव पोलिस ठाणे (पालघर)