अकोला- अमरावती महामार्ग निर्मितीचा गिनीज विश्व विक्रम भारतमातेच्या चरणांशी समर्पित – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

राजपथ इन्फ्राकॉन :- श्रमसाधनेच्या सन्मान स्मारकाचे लोकार्पण...

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

रवीकुमार मंडावार ,मनोज सातवी.

दिनांक २३ नोव्हेंबर रोजी अमरावती-अकोला महामार्गावरील ‘बडनेरा वाय पॉइंट’ येथे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नामदार श्री नितीनजी गडकरी यांच्या शुभ हस्ते या श्रमसाधनेच्या स्मारकाचे लोकार्पण झाले. या कार्यक्रमाच्या वेळी सौ. कांचनजी गडकरी, खा. अनिल बोंडे, खा. नवनीत राणा, आ. प्रवीण पोटे पाटील, आ. प्रताप अडसड, आ. सुलभा खोडके, राजपथचे सीएमडी जगदीश कदम, सौ. मोहना कदम,आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी ह महामार्ग निर्मिती आणि गिनीज विश्व विक्रम यांवर आधारित कॉफी टेबल बुकचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

अमरावती दि.२३ : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात दिनांक ३ जून २०२२ रोजी सकाळी ७ वाजून २७ मिनिटांनी सुरु झालेले हे काम ७ जून २०२२ रोजी संध्याकाळी ५ वाजता संपले. तब्बल १०५ तास ३३ मिनिटे सातत्याने काम करत राजपथने गिनीज विश्व विक्रमावर आपले नाव कोरले आहे . अकोला- अमरावती महामार्ग निर्मितीचा गिनीज विश्व विक्रम देशाला समर्पित आहे, असे मनोगत केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री ना. नितीनजी गडकरी यांनी व्यक्त करतांना बडनेरा वाय पॉइंट येथे राजपथ इन्फ्राकॉन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने उभारलेल्या गिनीज विश्वविक्रम स्तंभ स्मारकाच्या अनावरण प्रसंगी बोलत होते.

पुढे बोलताना गडकरी  म्हणाले की, हा विक्रम अमरावती-अकोला जिल्ह्यात नोंदवला जाणे हे विशेष आनंददायी आहे. या विक्रमाचे प्रतिक म्हणून उभारलेले सुरेख स्तंभ स्मारक या विक्रमाची ग्वाही देत आहे. तर बाजूला असलेल्या उड्डाणपुलावर देखील देशाचा गौरव वाढविणाऱ्या व्यक्तिमत्त्वांची चित्रे काढलेली त्यामुळे आसपासच्या परिसरातील बाळगोपलांना हे स्थळ सहलीसाठी उत्तम ठरेल याचा आनंद आहे. आता या महामार्गामुळे अमरावती – अकोला हे अंतर केवळ ५० मिनिटांत पार करता येणे शक्य आहे, असेही गडकरी यांनी सांगितले. या विश्वविक्रमी कार्याकरीता राजपथचे सीएमडी जगदीश कदम, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे सर्व कर्मचारी, अधिकारी आणि सर्व सहभागी व्यक्तींचे त्यांनी अभिनंदन केले.

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतकाळात प्रगतीची नवी वाटचाल करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक प्रयत्न केले जात आहेत. या उद्देशाने राजपथ इन्फ्राकॉन नव्या संकल्पना आणि नवी उमेद घेऊन काम करत आहे. देशांत रस्ते बांधणी पायाभूत सुविधा क्षेत्रांत गिनीज विश्व विक्रमावर आपले नाव कोरणारी राजपथ इन्फ्राकॉन ही एकमेव खासगी कंपनी आहे. या विश्व विक्रमाची आठवण म्हणून एक स्तंभ उभारण्यात आला आहे.

या गिनीज विश्व विक्रमाची कायमस्वरुपी आठवण राहावी . या उद्देशाने हे स्तंभ स्मारक उभारण्यात आले आहे. ‘श्रम हीच प्रतिष्ठा’ हे धोरण अंगीकारुन हे देशकार्य करताना शेकडो हात कामाला लागले. या कार्याच्या यशस्वीतेसाठी चिकाटीने व समर्पित भावनेने प्रयत्न करणाऱ्या सर्व ७२८ कामगारांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या स्तंभ स्मारकावर सर्व कामगारांचे नाव कोरण्यात आलेले आहे.

 

 

 

आ. प्रताप अडसडआ. प्रवीण पोटे पाटीलआ. सुलभा खोडकेखा. अनिल बोंडेखा.नवनीत राणाश्री नितीनजी गडकरीसौ. कांचनजी गडकरी