शेतकऱ्यांच्या समस्या आणि निर्ढावलेल्या प्रशासना विरोधात कुणबी सेनेचे शनीवारी रास्ता रोको आंदोलन…

लोकस्पर्श न्युज नेटवर्क, 

पालघर, दि. १० फेब्रुवारी : पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या विविध समस्यांच्या अनुषंगाने पालघर जिल्हाधिकारी यांच्यासोबत लोकप्रतिनिधी आणि कुणबी सेना प्रमुख विश्वनाथ पाटील, तसेच इतर पदाधिकारी यांची तहसीलदार पालघर यांच्या दालनात भात उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत सविस्तर चर्चा होऊन ई-पीक पाहणी नोंद नसलेल्या शेतकऱ्यांची यादी देऊनही आजपर्यंत प्रत्यक्षात कोणतीही कार्यवाही झालेली नाही. पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे वांद्री प्रकल्पांतर्गत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई द्यावी. शिवाय शेतकऱ्यांच्या इतर प्रश्नाबाबत न्याय मिळावा यासाठी शनिवारी कुणबी सेना प्रमुख विश्वनाथ पाटील यांच्या नेतृत्वाखाली पालघर मनोर मार्गावर चहाडे नाका येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. 

पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या विविध समस्यांबाबत खासदार राजेंद्र गावित, आमदार राजेश पाटील, कुणबी सेनाप्रमुख विश्वनाथ पाटील आणि पालघर जिल्हाप्रमुख अविनाश पाटील, तालुकाप्रमुख अरविंद कंडी यांच्या उपस्थितीत तहसीलदार पालघर यांच्या दालनात बैठक झालेली होती. त्यानंतर आश्वासना देऊन देखील प्रशासनाकडून कोणतीच कारवाई करण्यात आलेली नाही.

पालघर जिल्ह्यात एकूण दोन लाख पन्नास हजार शेतकरी खातेदार असून त्यापैकी यावर्षी फक्त चाळीस हजार शेतकऱ्यांनी ऑनलाईन ई-पीक पाहणी नोंदणी केलेली आहे. तांत्रिक अडचणींमुळे मोठ्या संख्येने शेतकरी ई-पीक पाहणी नोंदवू शकलेले नाहीत त्यामुळे सदरहून शेतकऱ्यांच्या सातबारावर सन २०२२/२३ च्या खरीप भाताची ई-पिक पाहणी नोंद दिसून येत नाही. त्यामुळे आदिवासी विकास महामंडळातर्फे या शेतकऱ्यांचे भात स्वीकारले जात नाही. शेतकऱ्यांनी अनेक वेळा तलाठी कार्यालयांमध्ये सातबारा उताऱ्यावर ई- पीक पाहणी करिता पायपीट केल्यावर काही तलाठ्यांनी लेखी नोंदणी करुन दिली तर काही मुजोर तलाठी नोंदणी करण्यास नकार देत आहेत.

या संभ्रमेव्यस्तेवर तोडगा काढण्यासंदर्भात अनेक वेळा भेटीगाठी घेऊन, चर्चा करूनही कोणतीही कार्यवाही झाली नाही. उलट भात खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांना तीव्र त्रासाला सामोरे जावे लागते. शेतकऱ्यांना स्वतः गोणी गाडीतून खाली करून गोडाऊन मध्ये थापी लावावी लागते. त्याच बरोबर काही शेतकऱ्यांकडून प्रती गोणीमागे ५ रुपये घेतले जातात. या सर्व त्रासाला कंटाळून नाईलाजाने

शेतकऱ्यांनी कुणबी सेनाप्रमुख मा. विश्वनाथ पाटीलसाहेब, जिल्हाप्रमुख अविनाश पाटील यांच्या नेतृत्वाखाली शनिवार दि.११/०२/२०२३ रोजी मनोर – पालघर राज्य महामार्गावरील “चहाडे नाका” या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे जनतेला होणाऱ्या संभाव्य त्रासाला शासनाचे प्रशासन जबाबदार राहील असा इशारा कुणबी सेनेच्या वतीने देण्यात आला आहे.

आंदोलन स्थगित करण्याची तहसीलदारांची विनंती मात्र कुणबी सेना रास्ता रोको आंदोलनावर ठाम

दरम्यान, कुणबी सेनेने रास्ता रोकोचा इशारा दिल्यानंतर पालघरचे तहसीलदार यांनी जिल्हाप्रमुख मा. अविनाश पाटील यांना दि. ८/२/२०२३ च्या पत्राद्वारे आणि फोन करुन रास्ता रोको आंदोलन स्थगित करण्याची विनंती केली होती. “मान. तहसिलदार यांनी पत्रात त्यांनी ईपीक पाहणी न झालेल्या शेतकऱ्यांची यादी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना पाठविल्याचे थातूरमातूर उत्तर दिले आहे. खरे तर त्यांच्याकडून सर्व शेतकऱ्यांचे भात खरेदी केले जाईल तसेच इतर मागण्यांवर योग्य ती कार्यवाही होईल असे ठोस लेखी पत्र मिळाले असते तरच आंदोलन स्थगित करण्याचा विचार झाला असता. परंतु प्रशासनाकडून असे कोणतेही ठोस आश्वासन न मिळाल्याने हे रास्ता रोको आंदोलन होणारच आहे.” अशी ठाम भूमिका घेत, जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

शेतकऱ्यांच्या मागण्या…

१) सन २०२२/२३ या वर्षी ऑनलाईन ई- पीक पाहणी नोंद न झालेल्या शेतकऱ्यांच्या ७/१२ वर नोंदणी करून मिळावी.

२) शेतकऱ्यांशी अरेरावी व सहकार्य करत नसलेल्या तलाठ्यांवर कारवाई व्हावी.

३) आदिवासी विकास महामंडळाकडून भात खरेदीस मुदतवाढ मिळावी.

४) भात खरेदी केंद्रावर होणारी शेतकऱ्यांची लुटमार थांबवावी.

५) शेतकऱ्यांनी स्वखर्चाने दिलेल्या बारदानाचे पैसे त्यांना मिळावे.

६) शेतकऱ्यांसाठी अनुदानित युरीया खताचा काळाबाजार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी.

७) शासनाने घोषित केलेला बोनस तातडीने शेतकऱ्यांना मिळावा.

८) वांद्री प्रकल्पांतर्गत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई द्यावी.