ना. विजय वडेट्टीवार यांचे आलापल्लीतील प्रचार सभेत पदवीधरांना आवाहन.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क:
गडचिरोली, दि. २९ नोव्हेंबर: गेल्या ४२ वर्षापासून भाजपचा उमेदवार नागपूर पदवीधर मतदार संघात निवडून येतो आहे. भाजपचा वरचष्मा असलेल्या या मतदार संघात पदवीधरांचे प्रश्न खरेच सुटले काय? असा प्रश्न पदवीधर मतदारांनी आता विचारणे गरजेचे आहे. त्यासाठी येत्या १ डिसेंबर ला होणाऱ्या नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत परिवर्तन घडवून महाविकास आघाडीचे उमेदवार अँँड. अभिजित वंजारी यांना विधान परिषदेत पाठवा. असे आवाहन राज्याचे मदत पुनर्वसन मंत्री ना.विजय वडेट्टीवार यांनी केले. ते आज आलापल्ली येथील सतीश मंगल कार्यालयात महाविकास आघाडीच्या घटक पक्षाद्वारे आयोजित अँँड. अभिजित वंजारी यांच्या प्रचारार्थ आयोजित प्रचार सभेत अध्यक्ष स्थानावरून बोलत होते.
यावेळी मंचावर जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार, कांग्रेस जिल्हाध्यक्ष माजी आ.डॉ नामदेव उसेंडी, शिवसेना जिल्हाप्रमुख राजगोपाल सुलवावार, जि. प. सदस्य अँँड. राम मेश्राम, जि. प. सदस्य रवींद्र शहा, जि. प. सदस्य संजय चरडूके, जि. प. सदस्य अजय नैताम, जि. प. सदस्य सुनिता कुसनाके, पंचायत समिती सभापती भास्कर तलांडे, उप सभापती गीता चालुरकर, शिवसेनेचे अरुण धुर्वे, सुभाष घुटे, रियाज शेख आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, आदिवासी विद्यार्थी संघटना, पिरिपा (कवाडे गट), रिपाई (गवई गट) आणि सर्व मित्र पक्षांच्या वतीने महाविकास आघाडीने शिक्षण क्षेत्रातील जाण असलेला अँँड. अभिजित गोविंदराव वंजारी तरुण चेहरा नागपूर विभागीय पदवीधर मतदार संघाच्या महाराष्ट्र विधानपरिषद निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून दिला आहे. पदवीधरांच्या समस्या सोडविण्यासाठी महाविकासआघाडी आघाडीने दिलेल्या बहुजन चेहऱ्यास विधानपरिषदेत पाठविण्याचे आवाहन राज्याचे मदत पुनर्वसन मंत्री ना.विजय वडेट्टीवार यांनी केले.
पुढे बोलताना ना. वडेट्टीवार यांनी महाविकास आघाडीच्या वतीने जुनी पेन्शन योजना व कायम विनाअनुदानित शाळांचा प्रश्न यावर कबिनेट मध्ये निर्णय करून विधानभवनात चर्चा करून ठोस निर्णय घेणार असल्याचे सांगितले. ओबीसीचा एक लाख पदांचा बॅकलाकचा प्रश्न मार्गी लावला. गडचिरोली जिल्ह्यातील ओबीसींचे आरक्षण सहा टक्क्यावरून १५ टक्क्यावर करण्यासाठी येत्या १५ ते २० दिवसात निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
जि.प. अध्यक्ष अजय कंकड़ालवार यावेळी उपस्थितांना संबोधित करतांना म्हणाले की, भाजपचे यापूर्वीचे पदवीधराचे उमेदवार निवडून आल्यानंतर या भागात फिरकले सुद्धा नाही. या भागातील पदवीधरांच्या समस्या सोडवण्याकडे त्यांनी दुर्लक्ष केले. बहुजनाचा चेहरा उच्च विद्या विभूषित पदवीधरांच्या प्रश्नांची जाण असणारा व प्राध्यापकांच्या व शिक्षकांच्या प्रश्नांची त्यांना जाणीव आहे. शैक्षणिक धोरणाविषयी त्यांनी माहिती अवगत आहे. असे महाविकास आघाडीचे उमेदवार अँँड. अभिजीत वंजारी असून सलग तीन वेळा सीनेट सदस्य राहिले आहेत. शैक्षणिक क्षेत्राविषयी त्यांचा अनुभव चांगला आहे. त्यामुळे यावेळी पदवीधरांनी अँँड. वंजारींच्या नावासमोर १ क्रमांक पसंतीक्रम दर्शवून त्यांना विजयी करण्याच्या आवाहन उपस्थितांना केले.
माजी आ. डॉ नामदेव उसेंडी यांनी आपल्या भाषणात विरोधकांवर कडाडून टीका केली गेल्या ४२ वर्षांपासून पदवीधरांचे नेतृत्व करणाऱ्यांचा चांगलाच समाचार त्यांनी घेतला. पदवीधरांच्या नावावर राजकारणात मोठे होऊन केंद्रीय राजकारणापर्यंत पोहोचल्यानंतरही अनेक विरोधी नेत्यांनी पदवीधरांच्या समस्या मात्र सोडवल्या नाही असा आरोप त्यांनी केला. यावेळी महाविकास आघाडीच्या पूर्वीपेक्षाही जास्त मताधिक्य मिळणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
कार्यक्रमाचे संचालन आंनद अलोने तर आभार प्रदर्शन सुनील आंईचवार यांनी केले कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली. कार्यक्रम यशस्वितेकरिता महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केले.