दुष्काळाच्या झळांत होरपळलेल्या ३० हजार शेतकऱ्यांना दिवाळीचा आधार!

गडचिरोलीतील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर १५ कोटी ३९ लाखांची अग्रीम मदत; प्रत्येकाला पाच हजार रुपये...

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली | प्रतिनिधी

दुष्काळाच्या संकटामुळे आर्थिक विवंचनेत सापडलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी दिवाळीच्या तोंडावर शासनाकडून दिलासादायक निर्णयाची अंमलबजावणी करण्यात आली आहे. जिल्ह्यातील ३० हजार ७८८ पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर तब्बल १५ कोटी ३९ लाख रुपये दिवाळी अग्रीम मदत म्हणून जमा करण्यात आली आहे. प्रत्येक पात्र शेतकऱ्याला पाच हजार रुपये देण्यात येत असून, ५ नोव्हेंबर २०२६ अखेर ही रक्कम वितरित करण्यात आली आहे.

गडचिरोली जिल्ह्यातील दोन तालुके दुष्काळग्रस्त म्हणून घोषित करण्यात आल्याने या मदत योजनेत जिल्ह्याचा समावेश झाला आहे. दुष्काळामुळे खरीप हंगामातील शेतीवर परिणाम झाल्याने शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे. अशा परिस्थितीत दिवाळीपूर्वी थेट बँक खात्यात जमा झालेली पाच हजारांची मदत शेतकरी कुटुंबांना काहीसा आर्थिक आधार देणारी ठरली आहे.

राज्यातील ३०४ दुष्काळग्रस्त तालुक्यांतील पात्र शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी आर्थिक मदत देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. त्यानुसार महसूल, मदत व पुनर्वसन आणि कृषी विभागाच्या समन्वयातून पात्र लाभार्थ्यांची प्रक्रिया पूर्ण करून मदतीचे वितरण सुरू करण्यात आले. शासनाच्या निर्णयानुसार ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये जमा करण्यात येत आहे.

तांत्रिक अडचणींमुळे काही शेतकरी प्रतीक्षेत…

दरम्यान, काही पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यांशी संबंधित तांत्रिक अडचणी, खाते क्रमांक किंवा तपशिलातील त्रुटी तसेच अन्य कारणांमुळे मदतीची रक्कम अद्याप जमा झालेली नाही. संबंधित अडचणी दूर करण्याची कार्यवाही सुरू असून, एकही पात्र दुष्काळग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये, यासाठी प्रशासनाकडून आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत.

मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनीही उर्वरित पात्र शेतकऱ्यांच्या अडचणी दूर करून त्यांना मदत देण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे तांत्रिक कारणांमुळे रक्कम न मिळालेल्या शेतकऱ्यांनाही लवकरच या मदतीचा लाभ मिळण्याची शक्यता आहे.

दुष्काळाच्या काळात थेट खात्यावर मदत…

दुष्काळी परिस्थितीत शेतीच्या उत्पन्नावर परिणाम झाल्याने बियाणे, खते, मशागत, कर्जफेड तसेच दैनंदिन खर्चाचा ताण शेतकरी कुटुंबांवर वाढला आहे. या पार्श्वभूमीवर शासनाकडून दिवाळीपूर्वी देण्यात आलेली अग्रीम मदत थेट खात्यावर जमा झाल्याने शेतकऱ्यांना तातडीच्या आर्थिक गरजा भागविण्यास हातभार लागणार आहे.

शासनाकडून या मदत वितरणावर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत असून, उर्वरित पात्र लाभार्थ्यांच्या खात्यांवरील तांत्रिक अडचणी दूर झाल्यानंतर पाच हजार रुपयांची मदत त्यांच्या खात्यातही जमा केली जाणार आहे हे विशेष.

Comments (0)
Add Comment