विधान परिषद निवडणुकीसाठी निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती…

वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली मतदारसंघावर स्वाती म्हसे पाटील यांची नजर; 18 जूनला मतदान, 22 जूनला मतमोजणी...

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली : महाराष्ट्र विधान परिषदेच्या स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीची प्रक्रिया वेगाने सुरू झाली असून वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली मतदारसंघासाठी भारत निवडणूक आयोगाने निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती केली आहे. संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, निष्पक्ष आणि सुरळीत पार पाडण्यासाठी स्वाती योगेश म्हसे पाटील यांची निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

भारत निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार या मतदारसंघासाठी 18 जून 2026 रोजी मतदान तर 22 जून 2026 रोजी मतमोजणी होणार आहे. निवडणूक प्रक्रियेतील प्रत्येक टप्प्यावर देखरेख ठेवण्याची जबाबदारी निरीक्षक म्हणून स्वाती म्हसे पाटील यांच्यावर सोपविण्यात आली आहे.

उमेदवार, राजकीय पक्षांचे प्रतिनिधी तसेच मतदारांच्या तक्रारी, सूचना किंवा निवडणुकीसंदर्भातील बाबी ऐकून घेण्यासाठी त्या बकुळ व्हीआयपी गेस्ट हाऊस, वन अकादमी, चंद्रपूर येथे दररोज सकाळी 11 ते 12 आणि सायंकाळी 5 ते 6 या वेळेत उपलब्ध राहणार आहेत.

याबाबतची माहिती वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा चंद्रपूर जिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

Comments (0)
Add Comment