अवैध डिझेल तस्करीवर आष्टी पोलिसांचा मोठा घाव

1,599 लिटर डिझेलसह ट्रॅक्टर-ट्रॉली जप्त; 7.58 लाखांचा मुद्देमाल ताब्यात, एकाला अटक....

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

गडचिरोली : जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध डिझेल-पेट्रोल वाहतूक व साठेबाजीविरोधातील मोहिमेला आष्टी पोलिसांनी मोठे यश मिळविले आहे. आष्टी पोलिसांनी कारवाई करत 1,599 लिटर अवैध डिझेल, ट्रॅक्टर व ट्रॉलीसह एकूण 7 लाख 58 हजार 780 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून एका आरोपीला अटक केली आहे.

पोलीस अधीक्षक एम. रमेश यांनी जिल्ह्यातील अवैध इंधन वाहतूक व विक्रीवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार आष्टी पोलिसांचे पथक रविवारी (31 मे) पेट्रोलिंग करत असताना गांधीनगर ते आनंदग्राम मार्गावर संशयास्पदरीत्या ड्रम वाहून नेणारा विना क्रमांकाचा ट्रॅक्टर दिसून आला. पोलिसांनी वाहन थांबवून चौकशी केली असता चालकाने आपले नाव किशोर विश्वजीत बिश्वास (रा. देवनगर, ता. मुलचेरा) असे सांगितले.

वाहनाची तपासणी केली असता दोन लोखंडी ड्रममध्ये 400 लिटर आणि पाच प्लास्टिक बॅरलमध्ये 1,199 लिटर असा एकूण 1,599 लिटर डिझेल आढळून आला. डिझेल वाहतुकीसाठी आवश्यक परवाना अथवा सक्षम प्राधिकरणाची कोणतीही परवानगी आरोपीकडे नसल्याचे उघड झाले.

यावेळी पोलिसांनी सुमारे 1 लाख 58 हजार 780 रुपयांचा डिझेल साठा तसेच वाहतुकीसाठी वापरण्यात आलेले जॉन डीअर कंपनीचे ट्रॅक्टर व ट्रॉली जप्त केली. जप्त मुद्देमालाची एकूण किंमत 7 लाख 58 हजार 780 रुपये इतकी आहे.

या प्रकरणी आष्टी पोलीस ठाण्यात जीवनावश्यक वस्तू अधिनियम 1955 च्या कलम 3 व 7 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी किशोर बिश्वास याला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक विशाल काळे करीत आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक कार्तिक मधिरा, गोकुल राज, अपर पोलीस अधीक्षक (अहेरी) हर्षवर्धन बी. जे. तसेच प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी अमर मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस निरीक्षक विशाल काळे यांच्या नेतृत्वाखाली पोउपनिरीक्षक गोकुलदास मेश्राम व आष्टी पोलीस पथकाने ही यशस्वी कारवाई पार पाडली.

Comments (0)
Add Comment