सुरजागड खाण परिसरातील बोडमेटा गावासाठी रस्त्याची मागणी; डीएमएफ (DMF) निधीतून काम करण्याची भाकपची विनंती

बोडमेटा ते आलेंगा फाटा रस्त्याअभावी ग्रामस्थांची गैरसोय..

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

गडचिरोली: एटापल्ली तालुक्यातील पुरसलगोंदी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या बोडमेटा गावातील नागरिकांच्या दळणवळणाच्या समस्येकडे प्रशासनाने लक्ष द्यावे, या मागणीसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या (भाकप) वतीने एटापल्लीच्या उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे. सुरजागड खाण क्षेत्रापासून अवघ्या ५ ते ७ किलोमीटर अंतरावर असलेल्या या गावासाठी ‘बोडमेटा ते आलेंगा फाटा’ हा रस्ता जिल्हा खनिकर्म प्रतिष्ठान (DMF) निधीतून तातडीने मंजूर करावा, अशी विनंती करण्यात आली आहे.

पायवाटेमुळे ग्रामस्थांना अडचणी..

बोडमेटा गावात जाण्यासाठी सध्या पक्का रस्ता उपलब्ध नसून ग्रामस्थांना जंगलातील पायवाटेने प्रवास करावा लागतो. त्यामुळे अनेक वर्षांपासून नागरिकांना ये-जा करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः पावसाळ्यात ही पायवाट निसरडी होत असल्याने आजारी व्यक्ती, वृद्ध नागरिक आणि गरोदर महिलांना आरोग्य केंद्रापर्यंत नेणे कठीण होते. तसेच विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी आणि शेतकऱ्यांना शेतीमाल बाजारात नेण्यासाठी मोठी कसरत करावी लागते.

या पार्श्वभूमीवर बोडमेटा येथील ग्रामस्थांनी बैठक घेऊन भाकपचे जिल्हा सहसचिव कॉ. सचिन मोतकुरवार यांच्याकडे ही समस्या मांडली होती. ग्रामस्थांच्या मागणीची दखल घेत त्यांनी प्रशासनाशी संपर्क साधून निवेदन सादर केले.

डीएमएफ (DMF) निधीतून रस्ता करण्याची मागणी..

खाणकामामुळे प्रभावित होणाऱ्या भागातील मूलभूत सुविधांच्या विकासासाठी जिल्हा खनिकर्म निधी (DMF) आणि प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजनेची (PMKKKY) तरतूद असते. बोडमेटा हे गाव सुरजागड खाण क्षेत्राच्या जवळ असल्याने, या निधीचा उपयोग करून बोडमेटा ते आलेंगा फाटा या माती-मुरूम रस्त्याचे काम प्राधान्याने हाती घ्यावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

या रस्त्याची प्रशासनामार्फत प्रत्यक्ष पाहणी करून अंदाजपत्रक तयार करावे आणि आवश्यक त्या प्रशासकीय मान्यता घेऊन काम सुरू करावे, अशी विनंती कॉ. सचिन मोतकुरवार यांनी केली आहे. तसेच या मागणीवर सकारात्मक निर्णय घेऊन कामाला गती द्यावी, असेही त्यांनी नमूद केले.

निवेदन सादर करताना भाकपचे जिल्हा सहसचिव कॉ. सचिन मोतकुरवार, जिल्हा सदस्य कॉ. सुरज जककुलवार यांच्यासह बोडमेटा गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.

Comments (0)
Add Comment