प्रत्येक बालक सुरक्षित, प्रत्येक कुटुंब जागरूक; गडचिरोलीत आरोग्य संरक्षणासाठी मोठी चळवळ – जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा

१०० टक्के लसीकरण, अतिसारमुक्त गावांचा संकल्प आणि सुरक्षित पाणी- -पुरवठ्यासाठी यंत्रणा सक्रिय..

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली : आदिवासीबहुल आणि भौगोलिकदृष्ट्या आव्हानात्मक असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील प्रत्येक बालकापर्यंत आरोग्यसेवेचा लाभ पोहोचविण्यासाठी प्रशासनाने व्यापक आणि परिणामकारक मोहीम हाती घेतली आहे. बालमृत्यू शून्यावर आणण्याचे ध्येय समोर ठेवत नियमित लसीकरणाची शंभर टक्के अंमलबजावणी, अतिसार प्रतिबंध, सुरक्षित पिण्याच्या पाण्याची उपलब्धता आणि लोकजागृती या चार आघाड्यांवर जिल्हा प्रशासनाने एकत्रित कृती आराखडा तयार केला आहे. जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी संबंधित सर्व यंत्रणांना यासाठी समन्वयाने आणि जबाबदारीने काम करण्याचे निर्देश दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हास्तरीय सुकाणू समितीच्या बैठकीत नियमित लसीकरण, ‘स्टॉप अतिसार मोहीम-२०२६’ आणि एचपीव्ही लसीकरण कार्यक्रमाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. यावेळी बोलताना जिल्हाधिकारी पंडा यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “बालकांचे आरोग्य ही केवळ आरोग्य विभागाची जबाबदारी नसून संपूर्ण प्रशासन आणि समाजाची सामूहिक जबाबदारी आहे. जिल्ह्यातील एकही बालक लसीकरणापासून वंचित राहू नये आणि उपचाराअभावी एकाही बालकाचा जीव जाऊ नये, यासाठी सर्वांनी संवेदनशीलतेने काम करणे गरजेचे आहे.”

पावसाळ्यात जलजन्य आजारांचा धोका वाढत असल्याने अतिसार प्रतिबंधासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांना सर्वोच्च प्राधान्य देण्याचे निर्देश देताना त्यांनी सुरक्षित पिण्याचे पाणी हीच पहिली आणि सर्वात प्रभावी लस असल्याचे नमूद केले. जलस्रोतांचे निर्जंतुकीकरण, पाणी नमुन्यांची नियमित तपासणी, गावपातळीवरील स्वच्छता मोहीम आणि दूषित पाण्याचा पुरवठा रोखण्यासाठी काटेकोर उपाययोजना राबविण्याचे आदेश त्यांनी दिले.

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रताप शिंदे यांनी मोहिमेचा आराखडा मांडताना सांगितले की, अतिसारामुळे होणारा एकही बालमृत्यू प्रशासन स्वीकारणार नाही. संभाव्य रुग्णांची तात्काळ ओळख, वेळेत उपचार, आवश्यक औषधसाठा आणि गरजेनुसार संदर्भ सेवा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हाभर विशेष यंत्रणा कार्यरत करण्यात आली आहे. १६ जून ते ३१ जुलै या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या मोहिमेसाठी सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे आणि अंगणवाड्यांमध्ये ‘ओआरएस-झिंक कॉर्नर’ कार्यान्वित करण्यात आले आहेत.

विशेषतः दुर्गम पाडे, वनक्षेत्रातील वस्ती, वीटभट्ट्या आणि स्थलांतरित कुटुंबांमधील बालकांपर्यंत आरोग्य सेवा पोहोचविण्यावर भर देण्यात येणार आहे. आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका आणि आरोग्य कर्मचारी घराघरांत जाऊन माता-पित्यांचे समुपदेशन करणार असून ओआरएस, झिंक गोळ्यांचा वापर, स्वच्छतेचे महत्त्व आणि लसीकरणाची आवश्यकता याबाबत व्यापक जनजागृती करणार आहेत.

अतिसारमुक्त गडचिरोली आणि बालमृत्यूमुक्त जिल्हा घडविण्याच्या या अभियानात आरोग्य विभागासोबत महिला व बाल विकास, शिक्षण, पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभागांची सक्रिय भूमिका राहणार आहे. ग्राम आरोग्य, पोषण आणि स्वच्छता दिन, शाळास्तरीय उपक्रम, अंगणवाडी केंद्रांतील प्रबोधन कार्यक्रम आणि ग्रामसभांच्या माध्यमातून जनसहभाग वाढविण्यावर भर दिला जाणार आहे.

आरोग्यदायी बालपण, सुरक्षित भविष्य आणि निरोगी गडचिरोलीच्या दिशेने टाकलेले हे पाऊल जिल्ह्याच्या सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेसाठी महत्त्वपूर्ण मानले जात आहे. प्रशासन, आरोग्य यंत्रणा आणि नागरिक यांचा सक्रिय सहभाग लाभल्यास बालमृत्यूमुक्त व अतिसारमुक्त गडचिरोलीचे स्वप्न प्रत्यक्षात उतरू शकते, असा विश्वास बैठकीत व्यक्त करण्यात आला.

बैठकीस प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. माधुरी किलनाके, बालरोगतज्ज्ञ डॉ. संदीप किरंगे, साथरोग अधिकारी डॉ. रुपेश पेंदाम तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. जिल्ह्यातील सर्व तालुका आरोग्य अधिकारी आणि वैद्यकीय अधीक्षकांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभाग नोंदविला.

Comments (0)
Add Comment