शाळांच्या विकासासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही; शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांची ग्वाही

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

गडचिरोली: केवळ पुस्तकी ज्ञान देणे पुरेसे नसून भावी पिढीवर राष्ट्रभक्ती आणि नैतिक मूल्यांचे संस्कार रुजवणे ही काळाची गरज आहे. गडचिरोलीसारख्या दुर्गम भागात अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिक्षक ज्ञानदानाचे पवित्र कार्य करत असून, शाळांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शासन निधीची कोणतीही कमतरता भासू देणार नाही, अशी ग्वाही शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी दिली.

‘चला शाळेत जाऊया’ अभियानांतर्गत शिक्षणमंत्र्यांनी जिल्ह्यातील विविध शाळांना भेटी देऊन पाहणी केली. त्यानंतर सामाजिक न्याय भवन सभागृहात आयोजित गुणवंत विद्यार्थी आणि आदर्श शिक्षक सत्कार सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर आमदार डॉ. मिलिंद नरोटे, आमदार रामदास मसराम, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, अपर जिल्हाधिकारी संजय आसवले, शिक्षण उपसंचालक माधुरी सावरकर, शिक्षणाधिकारी वासुदेव भुसे व प्रेरक उजगारे उपस्थित होते.

गावात मंदिराच्या उभारणीसाठी ज्याप्रमाणे संपूर्ण गाव एकत्र येते, त्याचप्रमाणे शाळा हे ज्ञानमंदिर मानून तिच्या विकासासाठी माजी विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थांनी लोकसहभागातून पुढे यावे, असे आवाहन त्यांनी केले. शाळांमध्ये पिण्याचे शुद्ध पाणी, स्वच्छतागृहे, वर्गखोल्या, क्रीडांगण, ई-लॅब व वाचनालय यांसारख्या मूलभूत सुविधा दर्जेदार असाव्यात, असे स्पष्ट करत विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने धोकादायक ठरणाऱ्या जीर्ण इमारतींचे तात्काळ निर्लेखन करून नवीन इमारतींचे प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले.

राज्यात पवित्र पोर्टलद्वारे पारदर्शक शिक्षक भरती प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून लवकरच रिक्त जागांवर शिक्षक रुजू होतील, तसेच केंद्रप्रमुखांच्या प्रलंबित पदोन्नतीचा प्रश्न मार्गी लावल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, शिक्षणमंत्र्यांनी रामनगर येथील पीएम श्री जवाहरलाल नेहरू शाळा, प्लॅटिनम ज्युबली हायस्कूल, गोगाव व बोदली येथील जिल्हा परिषद शाळांना प्रत्यक्ष भेटी दिल्या. बोदली येथे त्यांनी विद्यार्थ्यांसोबत पोळा सण साजरा केला, विद्यार्थिनींकडून राखी बांधून घेतली आणि डिजिटल क्लासरूमची पाहणी केली.

कार्यक्रमात इस्रो शैक्षणिक सहलीचा अनुभव मांडणारी सन्ना पठाण, ‘इन्स्पायर अवॉर्ड’ विजेता ध्रुव कोवे, राज्य विज्ञान मेळाव्यात चमकलेला नमन पेदापल्लीवार यांच्यासह राष्ट्रीय खेळाडू व शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचा तसेच दिलीप नाकाडे, प्रवीण दोर्लीकर या आदर्श शिक्षकांचा शिक्षणमंत्र्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

Comments (0)
Add Comment