आंतरराज्यीय सीमेवर घनदाट जंगलात चालणाऱ्या ‘हायप्रोफाइल’ जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; तब्बल १.३४ कोटींचा मुद्देमाल जप्त, ३१ जण जेरबंद

गडचिरोली पोलिसांचा छत्तीसगड सीमेवरील गहाणेगाळा जंगलात थरारक 'ऑपरेशन सर्जिकल स्ट्राइक'..

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली:महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवरील घनदाट जंगलाचा गैरफायदा घेत सुरू असलेल्या एका बड्या आंतरराज्यीय जुगार अड्ड्यावर गडचिरोली पोलिसांनी अत्यंत धाडसी कारवाई करत दणका दिला आहे. पोलीस मदत केंद्र बेडगावच्या पथकाने गहाणेगाळा जंगल परिसरात अचानक छापा टाकून २२ आलिशान चारचाकी वाहने, ६ दुचाकी, मोबाईल आणि रोख रकमेसह तब्बल १ कोटी ३४ लाख १४ हजार १० रुपयांचा विक्रमी मुद्देमाल जप्त केला. या धडक मोहिमेत घटनास्थळावरून ३१ आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या असून, पसार झालेल्या सूत्रधारांसह ३७ जणांवर कोरची पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जंगलातील अंधारात ‘खाकी’ची गनिमी कावा कारवाई..

बेडगाव पोलीस मदत केंद्राच्या हद्दीतील आंतरराज्य सीमेलगत असलेल्या मौजा गहाणेगाळा जंगलात छुप्या पद्धतीने ५२ पत्त्यांवर लाखो रुपयांची हार-जीत सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक एम. रमेश यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्याचे सक्त आदेश दिले होते.

माहितीची खातरजमा होताच, उपनिरीक्षक दिनेश खोटेले यांच्या नेतृत्वाखालील पथकाने मध्यरात्रीच्या सुमारास स्थानिक पंचांना सोबत घेऊन जंगलात कूच केले. वाहनांचा आवाज जाऊ नये म्हणून अत्यंत सावधगिरी बाळगत पोलिसांनी पायी अंतर पार केले आणि जुगाराच्या अड्ड्याला चहूबाजूंनी वेढा घातला.

पोलिसांची चाहूल लागताच पळापळ; ३१ जण जाळ्यात..

पोलिसांनी थेट अड्ड्यावर धाड टाकताच जुगारींमध्ये एकच खळबळ उडाली. अंधाराचा आणि घनदाट झाडीचा फायदा घेत काहींनी जंगलात पळ काढण्याचा प्रयत्न केला; मात्र दबा धरून बसलेल्या पोलीस पथकाने अत्यंत शिताफीने पाठलाग करून शैलेंद्र कुमार साहू (वय २६, रा. बेलारगोंदी, जि. राजनांदगाव), मोहम्मद बसिर (वय ४८, रा. राजनांदगाव) यांच्यासह तब्बल २९ जणांना जागीच ताब्यात घेतले.

अटक आरोपींची कसून चौकशी केली असता, हा जुगार अड्डा छत्रपती बांगरे (रा. कोरची), अमजतखॉ पठाण, तालीब (दोघे रा. डोंगरगड), राजा ब्रँड ऊर्फ राजा श्रिवास आणि हेमंत राजपूत (दोघे रा. राजनांदगाव) यांनी भरवल्याची धक्कादायक माहिती समोर आली.

२२ चारचाकींसह कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त..

घटनास्थळाची व आरोपींची कसून अंगझडती घेतली असता, जंगलात उभ्या करून ठेवलेल्या २२ चारचाकी वाहने, ६ दुचाकी वाहने, २६ मोबाईल फोन, ७५,०१० रुपयांची रोख रक्कम आणि जुगाराचे साहित्य असा एकूण तब्बल १ कोटी ३४ लाख १४ हजार ०१० रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आला. याप्रकरणी ३१ जणांना ताब्यात घेण्यात आले असून, कोरची पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १३३/२०२६ नुसार कलम १२ (अ) महाराष्ट्र जुगार कायद्यान्वये एकूण ३७ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पसार झालेले सोनू कांबळे (दुर्ग), इम्रान शेख (डोंगरगाव), बबलू खाटीक (भिलाई), रोहित साहू (राजनांदगाव), बसंत सोनी (दुर्ग) व अबुल वर्मा (राजनांदगाव) यांचा पोलीस कसून शोध घेत आहेत.

पोलिसांच्या सतर्कतेचे सर्वत्र कौतुक..

नक्षलग्रस्त व संवेदनशील भागात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासोबतच आंतरराज्यीय गुन्हेगारीच्या मुळावर घाव घालणाऱ्या या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे. ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) कार्तिक मधीरा, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी., उपविभागीय पोलीस अधिकारी (कुरखेडा) प्रमोद मडामे आणि कोरचीचे पोलीस निरीक्षक दीपक डोंब यांच्या नेतृत्वात पार पडली. कारवाईत प्रत्यक्ष फिल्डवर पोउपनि. दिनेश खोटेले, पोलीस अंमलदार विकास शेंडे, अनिल मडावी, सचिन येलमुलवार, मिथुन रासेकर आणि उमेशकुमार बन्सोड यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली.

Comments (0)
Add Comment