लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
सहा वर्षांपासून आलापल्ली–सिरोंचा महामार्ग रखडलेला; कोट्यवधींच्या खर्चानंतरही नागरिकांच्या वाट्याला खड्डे, धूळ, चिखल आणि अर्धवट कामेच — निधी कुठे गेला, कामे का रखडली आणि जबाबदार कोण?
रवि मंडावार
सिरोंचा : महाराष्ट्राच्या नकाशावर असलेला सिरोंचा विकासाच्या नकाशावर नेमका कधी येणार? हा प्रश्न आता केवळ सिरोंच्यातील नागरिकांचा राहिलेला नाही, तर शासनाच्या रस्ते विकासाच्या दाव्यांनाच आव्हान देणारा ठरला आहे. सहा वर्षांपासून आलापल्ली–सिरोंचा महामार्गाचे काम सुरू आहे; मात्र रस्ता पूर्ण होण्याचे नाव घेत नाही.
कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर होतो, भूमिपूजन होते, कामे सुरू झाल्याचे सांगितले जाते; पण प्रत्यक्ष रस्त्यावर उतरल्यावर नागरिकांना दिसतो तो खड्डे, धूळ, चिखल, खडी आणि अर्धवट बांधकामांचा प्रवास. मग प्रश्न सरळ आहे—निधी मंजूर होतोय, तर रस्ता पूर्ण का होत नाही? सहा वर्षे नेमकी कोणाच्या प्रतीक्षेत आहेत?
राज्याचे बांधकाम मंत्री ना. शिवेंद्रराजे भोसले गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यामुळे सिरोंचा तालुक्यातील नागरिकांची मागणीही तितकीच स्पष्ट आहे—दौरा केवळ बैठका, आढावे आणि कागदावरील अहवालांपुरता नको; एकदा आलापल्लीपासून सिरोंच्यापर्यंतचा रस्ता प्रत्यक्ष प्रवास करून पाहा.
१०० किलोमीटरचा रस्ता; पण विकासाचा वेग कुठे?..
आलापल्ली ते सिरोंचा हा सुमारे १०० किलोमीटरचा मार्ग दक्षिण गडचिरोलीची जीवनवाहिनी आहे. जिल्हा मुख्यालयापासून सुमारे २२० किलोमीटर अंतरावर असलेल्या सिरोंच्याला जोडणारा हा महत्त्वाचा मार्ग वर्षानुवर्षे बांधकामाच्या विळख्यात आहे.
कुठे रस्ता अर्धवट, कुठे खडी उखडलेली, कुठे खड्ड्यांचे साम्राज्य तर कुठे सुरू असलेले काम—अशा परिस्थितीत वाहनचालकांना प्रवास करावा लागत आहे. राष्ट्रीय महामार्गाच्या नावाखाली नागरिकांना जर असा प्रवास करावा लागत असेल, तर ग्रामीण रस्त्यांची अवस्था काय असेल, हा प्रश्न शासनाने स्वतःला विचारण्याची वेळ आली आहे.
पावसाळा आला की सिरोंचा पुन्हा ‘बेट’?..
पावसाळ्यात या मार्गाची अवस्था आणखी गंभीर होते. अनेक ठिकाणी पाणी साचते, पुलांवरून पाणी वाहते आणि वाहतूक ठप्प होण्याची शक्यता निर्माण होते.याचा सर्वाधिक फटका सर्वसामान्यांना बसतो. गंभीर रुग्णाला वेळेत रुग्णालयात नेता येत नसेल, विद्यार्थ्यांना शाळा-कॉलेज गाठणे कठीण होत असेल आणि व्यापाऱ्यांना मालवाहतुकीसाठी पर्यायी मार्ग शोधावा लागत असेल, तर हा केवळ रस्त्याचा प्रश्न नाही—हा शासनाच्या मूलभूत सेवांच्या कार्यक्षमतेचा प्रश्न आहे.
दरवर्षी आलापल्ली–सिरोंचा मार्ग बंद पडण्याची वेळ आली की नागरिकांना तेलंगणामार्गे गडचिरोली जिल्हा मुख्यालय गाठावे लागते. महाराष्ट्रातील तालुका मुख्यालयाला महाराष्ट्रातूनच पोहोचणे कठीण व्हावे, यापेक्षा मोठी प्रशासनिक विडंबना कोणती?
सिरोंचाच नाही, ग्रामीण भागही रस्त्याच्या प्रतीक्षेत…
झिंगानूर परिसरातील अनेक गावांनाही अद्याप दर्जेदार रस्त्यांची प्रतीक्षा आहे. झिंगानूर मार्गावरील नैगुंडा नाला आणि टेकडा मार्गावरील बोरमपल्ली नाला यांसारखी कामे दीर्घकाळ प्रलंबित असल्याने पावसाळ्यात नागरिकांची कोंडी होते.रेगुंठा परिसरातील मार्गाचीही तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.
म्हणजे एकीकडे शासनाकडून विकासाच्या मोठमोठ्या घोषणा, निधीच्या आकड्यांची मांडणी आणि नवीन प्रकल्पांचे आश्वासन; तर दुसरीकडे प्रत्यक्ष जमिनीवर रस्ते आणि पूल वर्षानुवर्षे अपूर्ण. मग विकासाचा हा पैसा नेमका कुठे आणि कसा खर्च होतो, याचा जाब कोण देणार?
निधी मंजूर; काम रखडले—जबाबदार कोण?..
रस्ते आणि पुलांसाठी मोठ्या प्रमाणात निधी मंजूर होत असताना कामे वर्षानुवर्षे रखडत असतील, तर निधीच्या विनियोगापासून कामाच्या गुणवत्तेपर्यंत प्रत्येक बाबीची स्वतंत्र चौकशी झाली पाहिजे, अशी नागरिकांची मागणी आहे.मंजूर आराखडा काय होता? प्रत्यक्षात किती काम झाले? किती निधी खर्च झाला? कोणत्या कंत्राटदाराला काम देण्यात आले? कामाला विलंब का झाला? वापरलेल्या साहित्याची गुणवत्ता काय? आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे—सहा वर्षांच्या विलंबाची जबाबदारी नेमकी कोणाची?
या प्रश्नांची उत्तरे केवळ कागदावरील अहवालात नकोत. ती सिरोंच्याच्या रस्त्यावर दिसली पाहिजेत.
आता ‘आढावा’ नको, अंतिम मुदत हवी!..
ना. शिवेंद्रराजे भोसले यांनी गडचिरोली दौऱ्यात सिरोंचा–आलापल्ली मार्गाची प्रत्यक्ष पाहणी करून प्रलंबित कामांना स्पष्ट कालमर्यादा द्यावी, अशी नागरिकांची मागणी आहे.यासोबतच सिरोंचा तालुक्यातील सर्व प्रमुख रस्ते, पूल आणि नाल्यांच्या कामांचा स्वतंत्र आढावा घेऊन बारमाही सुरक्षित वाहतुकीसाठी ठोस कृती आराखडा तयार करावा. सहा वर्षे नागरिकांनी संयम ठेवला. आता आणखी आश्वासने नकोत.
सिरोंच्याला कागदावरचा विकास नको; रस्त्यावर दिसणारा विकास हवा आहे.
आणि म्हणूनच बांधकाम मंत्र्यांना सिरोंच्यातील नागरिकांचा थेट सवाल—
“ना. भोसले साहेब, मंत्रालयातून सिरोंच्याच्या रस्त्यांचा आढावा घेऊ नका… एकदा प्रत्यक्ष सिरोंच्यात या. गाडी रस्त्यावरून चालवून पाहा. मग ठरवा—हा महामार्ग आहे की सहा वर्षांपासून सुरू असलेली शासनाच्या आश्वासनांची परीक्षा?”