‘निकोटीनच्या जाळ्यातून तरुणाईला वाचवा’; गडचिरोलीत तंबाखूमुक्त समाजासाठी जागृतीचा निर्धार

जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त जिल्हा रुग्णालयात जनजागृतीचा जागर; चित्रकला-निबंध स्पर्धांतून विद्यार्थ्यांचा बुलंद संदेश.....

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

गडचिरोली : तंबाखूचे व्यसन हे केवळ वैयक्तिक सवय नसून समाजाच्या आरोग्याला पोखरणारे एक गंभीर संकट आहे. विशेषतः युवकांमध्ये वाढणारी निकोटीनची सवय भविष्यातील पिढीच्या आरोग्यासाठी धोक्याची घंटा ठरत असताना, गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त जनजागृतीचा प्रभावी जागर करण्यात आला. “भ्रामक आकर्षणाचा पर्दाफाश करूया; निकोटीन आणि तंबाखूच्या व्यसनाविरुद्ध लढा देऊया” या घोषवाक्याखाली आयोजित कार्यक्रमातून तंबाखूमुक्त समाज उभारणीचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

राष्ट्रीय मौखिक आरोग्य कार्यक्रमांतर्गत आयोजित या उपक्रमाला वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. वर्षा लहाडे उपस्थित होत्या.

कार्यक्रमात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांमुळे होणाऱ्या घातक परिणामांवर सखोल मार्गदर्शन करण्यात आले. तोंडाचा कर्करोग, हृदयविकार, फुफ्फुसांचे आजार, श्वसनविकार आणि अनेक जीवघेण्या आजारांचे मूळ तंबाखूच्या व्यसनात असल्याचे सांगत तज्ज्ञांनी युवकांना वेळेत सावध होण्याचे आवाहन केले.

“प्रत्येक दिवस हा तंबाखू विरोधी दिन असला पाहिजे,” असे प्रतिपादन करत जिल्हा सल्लागार डॉ. प्रेरणा राऊत यांनी तंबाखूमुक्त समाज निर्माण करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने जबाबदारी स्वीकारण्याची गरज अधोरेखित केली. केवळ सरकारी मोहिमा नव्हे, तर समाजाच्या सहभागातूनच व्यसनमुक्त पिढी घडू शकते, असे त्यांनी नमूद केले.

दंत शल्यचिकित्सक डॉ. चंद्रशेखर शानगोंडा यांनी मौखिक आरोग्याचे महत्त्व विशद करताना तंबाखूमुळे तोंडाच्या कर्करोगाचा धोका अनेक पटींनी वाढत असल्याचे सांगितले. तोंडातील पांढरे किंवा लाल चट्टे, न भरणाऱ्या जखमा आणि इतर असामान्य लक्षणांकडे दुर्लक्ष न करता तातडीने तपासणी करून घेण्याचे आवाहन त्यांनी केले.

अध्यक्षीय भाषणात डॉ. वर्षा लहाडे यांनी युवक आणि विद्यार्थ्यांमध्ये वाढणाऱ्या व्यसनाधीनतेबद्दल चिंता व्यक्त केली. तंबाखूचे आकर्षण क्षणिक असले तरी त्याचे परिणाम आयुष्यभर भोगावे लागतात, असे सांगत त्यांनी निरोगी आणि व्यसनमुक्त जीवनशैलीचा स्वीकार करण्याचे आवाहन केले.

जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त आयोजित चित्रकला आणि निबंध स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी प्रभावी कलाकृती व विचारांद्वारे तंबाखूविरोधी संदेश दिला. विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेतून व्यसनमुक्त समाजाची हाक उमटताना दिसली.

चित्रकला स्पर्धेत हरिशकुमार कोठावार यांनी प्रथम, तेजस्विनी वासनिक यांनी द्वितीय आणि अल्पेशा खेवले यांनी तृतीय क्रमांक पटकावला. तर निबंध स्पर्धेत हरिशकुमार कोठावार प्रथम, तोशिना नाकडे द्वितीय आणि तेजस्विनी वासनिक तृतीय क्रमांकाच्या मानकरी ठरल्या. विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी व प्रमाणपत्रे प्रदान करून गौरविण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन राहुल कंकनालवार यांनी केले. या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. प्रेरणा राऊत, मिना दिवटे, राहुल चावरे, वैशाली बोबाटे, शिल्पा सरकार, भूपेश दरडमारे तसेच नर्सिंग विद्यालयातील विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

CancerGadchiroli Cancer dayMounth cancerTabbaco
Comments (0)
Add Comment