विद्यार्थ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष; मोदी सरकार बरखास्त करण्याची शेकापची राष्ट्रपतींकडे मागणी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

गडचिरोली : विद्यार्थ्यांच्या मागण्यांकडे सातत्याने दुर्लक्ष करून केंद्र सरकार हुकूमशाही पद्धतीने कारभार करत असल्याचा आरोप करत, नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारला तातडीने बरखास्त करावे, अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाने राष्ट्रपतींकडे केली आहे.

शेतकरी कामगार पक्षाच्या आदिवासी-भटके विमुक्त आघाडीचे प्रदेशाध्यक्ष भाई रामदास जराते यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने निवासी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतींना निवेदन सादर केले. निवेदनात केंद्र सरकारवर सर्वसामान्य जनता व विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच सरकार अदानी-अंबानी यांच्या हितासाठी काम करत असून सामान्य जनतेच्या हक्कांकडे दुर्लक्ष करत असल्याचे म्हटले आहे.

देशभरातील विविध स्पर्धा परीक्षांचे प्रश्नपत्रिका फुटल्याने लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले असून, या प्रकरणात केंद्र सरकार जबाबदारी स्वीकारत नसल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे. दिल्लीतील जंतर-मंतर येथे युवक संघटनांकडून सुरू असलेल्या आंदोलनाचा उल्लेख करत शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणीही करण्यात आली आहे.

शास्त्रज्ञ सोनम वांगचूक यांच्या आंदोलनाबाबत सरकारने बळाचा वापर केल्याचा आरोप करत, त्यांच्या तसेच आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना शेतकरी कामगार पक्षाने जाहीर पाठिंबा दिल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. लोकशाही व संविधानिक मूल्यांना धक्का देणाऱ्या सरकारच्या कार्यपद्धतीचा निषेध करत, देशातील जनतेच्या भावना लक्षात घेऊन केंद्र सरकार बरखास्त करण्याची मागणी राष्ट्रपतींकडे करण्यात आली आहे.

यावेळी शेकापचे मध्यवर्ती समिती सदस्य भाई शामसुंदर उराडे, जिल्हा समिती सदस्य डॉ. गुरुदास सेमस्कर, डंबाजी भोयर, महिला नेत्या जयश्रीताई वेळदा, चंद्रकांत भोयर, योगेश चापले, कविता मेश्राम, संगिता चांदेकर, पौर्णिमा कांबळे, सोनाली कवडो आदी उपस्थित होते.

Comments (0)
Add Comment