निसर्ग वाचविण्याची लढाई विद्यार्थ्यांच्या हातात; पर्यावरण संतुलनासाठी युवकांनी परिवर्तनाचे नेतृत्व घ्यावे – वनपरिक्षेत्राधिकारी विलास कोसनकर

'जंगल टिकले तरच जल, जमीन आणि जीवन टिकेल'; पर्यावरण संवर्धनासाठी विद्यार्थ्यांना दिला कृतीचा मंत्र...

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

अहेरी : वाढते शहरीकरण, जंगलांची होत असलेली तोड, हवामान बदलाचे तीव्र होत चाललेले परिणाम आणि जैवविविधतेसमोरील वाढते संकट या पार्श्वभूमीवर पर्यावरण संरक्षण ही केवळ शासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाची सामाजिक बांधिलकी आहे. विशेषतः विद्यार्थीच समाजपरिवर्तनाचे प्रभावी माध्यम ठरू शकतात. निसर्गाचे संतुलन अबाधित ठेवण्यासाठी विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतल्यास पर्यावरण संवर्धनाची व्यापक लोकचळवळ उभी राहू शकते, असे प्रतिपादन वनपरिक्षेत्राधिकारी विलास कोसनकर यांनी केले.

भगवंतराव मेमोरियल शिक्षण संस्था, अहेरी संचलित भगवंतराव उच्च माध्यमिक आश्रम शाळा, कमलापूर येथे “पर्यावरण रक्षणात विद्यार्थ्यांची भूमिका” या विषयावरील विशेष व्याख्यानात ते बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. सोहेल शेख होते. प्रमुख अतिथी म्हणून प्रा. आशिष ठाकरे, विजय सरदार आणि सामाजिक कार्यकर्ते खोजेंद्रनाथ सिडाम उपस्थित होते.

व्याख्यानात बोलताना विलास कोसनकर म्हणाले की, गेल्या पंचवीस वर्षांत पर्यावरणात झालेल्या बदलांचा अभ्यास केला असता, मानवी हस्तक्षेपामुळे नैसर्गिक समतोल मोठ्या प्रमाणात ढासळल्याचे स्पष्ट दिसून येते. जंगलांचे क्षेत्र कमी होत आहे, पाण्याचे स्रोत आटत आहेत, तापमान सातत्याने वाढत आहे, तर अनेक वन्यजीवांचे नैसर्गिक अधिवास धोक्यात आले आहेत. याचा थेट परिणाम मानवी जीवन, शेती, पाणी आणि आरोग्यावर होत आहे.

ते पुढे म्हणाले की, जंगल हे केवळ झाडांचे समूह नसून ते जलस्रोतांचे उगमस्थान, जैवविविधतेचे आश्रयस्थान आणि पृथ्वीच्या पर्यावरणीय संतुलनाचे प्रमुख आधारस्तंभ आहेत. जंगल सुरक्षित राहिले तरच पाणी, हवा, माती आणि मानवी अस्तित्व सुरक्षित राहील. त्यामुळे पर्यावरण संवर्धनाची सुरुवात शाळा आणि महाविद्यालयांपासून होणे ही काळाची गरज आहे.

विद्यार्थ्यांनी केवळ वृक्षारोपण करून थांबू नये, तर लावलेल्या प्रत्येक रोपट्याचे संगोपन करावे, प्लास्टिकमुक्त गाव उभारण्यासाठी जनजागृती करावी, पाणी संवर्धन, जैवविविधतेचे संरक्षण, वन्यजीवांचे महत्त्व आणि हवामान बदलाच्या परिणामांबाबत समाजात जागरूकता निर्माण करावी. आजचे विद्यार्थीच उद्याचे धोरणकर्ते, संशोधक आणि जबाबदार नागरिक असल्याने पर्यावरण संवर्धनात त्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

“पृथ्वी आपल्याला पूर्वजांकडून वारसा म्हणून मिळालेली नाही; ती पुढील पिढ्यांकडून घेतलेली उधारी आहे. त्यामुळे पर्यावरणाचे संरक्षण करणे ही प्रत्येकाची नैतिक जबाबदारी आहे,” असे सांगत त्यांनी विद्यार्थ्यांना पर्यावरण रक्षणाची सामूहिक शपथ घेण्याचे आवाहन केले.

यावेळी वनपरिक्षेत्र कार्यालय रेपनपल्ली यांच्या वतीने विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेच्या प्रतींचे वितरण करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय प्राचार्य किशोर बुरबुरे यांनी करून दिला. सूत्रसंचालन प्रा. आशिष ठाकरे यांनी केले, तर महेश गावडे यांनी आभार मानले.

Comments (0)
Add Comment