लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली : चामोर्शी येथे सात वर्षीय चिमुकलीवरील लैंगिक अत्याचाराच्या अत्यंत गंभीर प्रकरणात गडचिरोली पोलिसांनी वेगवान आणि प्रभावी तपासाची नोंद करत आरोपीला अवघ्या १२ तासांत अटक केली. त्यानंतर अविरत तपास पूर्ण करून घटनेच्या केवळ २८ दिवसांत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. महिला व बालकांवरील गंभीर गुन्ह्यांबाबत गडचिरोली पोलिसांच्या ‘शून्य सहनशीलता’ धोरणाचे हे आणखी एक ठळक उदाहरण मानले जात आहे.
८ जून २०२६ रोजी चामोर्शी येथे सात वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आली होती. या प्रकरणी पीडितेच्या आईच्या तक्रारीवरून चामोर्शी पोलीस ठाण्यात आरोपी प्रज्वल ऊर्फ नारू सदाशिव भांडेकर (वय २५, रा. चामोर्शी) याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ६४(१), ६५(२) तसेच पॉक्सो (POCSO) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक एम. रमेश आणि सहाय्यक पोलीस अधीक्षक अनिकेत हिरडे यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन तपासाला गती दिली. पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार तीन स्वतंत्र तपास पथके स्थापन करण्यात आली. भौतिक पुरावे, तांत्रिक विश्लेषण आणि साक्षीदारांच्या जबाबांच्या आधारे पोलिसांनी आरोपीचा माग काढत त्याला घटनेच्या अवघ्या १२ तासांत अटक केली.
तपासादरम्यान आरोपीविरुद्ध यापूर्वी सन २०१९ मध्ये विनयभंग आणि अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाल्याचे निष्पन्न झाले. या पार्श्वभूमीवर प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन तपास युद्धपातळीवर पूर्ण करण्यात आला आणि अवघ्या २८ दिवसांत न्यायालयात दोषारोपपत्र सादर करण्यात आले.
या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस अधीक्षक अनिकेत हिरडे यांनी केला. पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक (अभियान) कार्तिक मधिरा आणि अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी. यांच्या देखरेखीखाली ही संपूर्ण कारवाई पार पडली.
महिला व बालकांवरील अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये कोणतीही हयगय केली जाणार नाही. अशा गंभीर गुन्ह्यांचा जलद, निष्पक्ष आणि गुणवत्तापूर्ण तपास करून आरोपींना कायद्यानुसार कठोर शिक्षा मिळावी, यासाठी गडचिरोली पोलीस दल कटिबद्ध आहे.
एम. रमेश,
पोलीस अधीक्षक गडचिरोली,