इंग्लंडमध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करण्याची गोंडवाना विद्यापीठाच्या विद्यार्थ्याला संधी

मॉडेल कॉलेजच्या रोहीत राठोडची काउंटी क्लब क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड; विद्यापीठाच्या शिरपेचात मानाचा तुरा...

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली, दि. ५ जुलै :

गोंडवाना विद्यापीठाच्या क्रीडा क्षेत्रातील यशाला आणखी एक मानाचा मुकुट लाभला असून, विद्यापीठाचे घटक महाविद्यालय असलेल्या मॉडेल कॉलेजमधील बी.बी.ए. (जंगले व्यवस्थापन) शाखेचा विद्यार्थी रोहीत राठोड याची इंग्लंडमध्ये होणाऱ्या प्रतिष्ठित काउंटी क्लब क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय प्रतिनिधी संघात निवड झाली आहे. या उल्लेखनीय यशामुळे गोंडवाना विद्यापीठासह संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात आनंदाचे आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

रोहीत राठोड इंग्लंडमध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करत आपल्या क्रिकेट कौशल्याचा ठसा उमटविणार आहे. दुर्गम भागातून राष्ट्रीय स्तरापर्यंत आणि आता आंतरराष्ट्रीय स्तरावर झेप घेणाऱ्या रोहितच्या या यशाकडे युवा खेळाडूंसाठी प्रेरणादायी कामगिरी म्हणून पाहिले जात आहे.

या यशाबद्दल मॉडेल कॉलेजमध्ये आयोजित कार्यक्रमात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विवेक जोशी यांच्या हस्ते रोहितचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी त्याचे अभिनंदन करून आगामी स्पर्धेसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

यावेळी प्राचार्य डॉ. जोशी म्हणाले, “रोहीतने कठोर परिश्रम, सातत्य, शिस्त आणि जिद्दीच्या बळावर हे यश संपादन केले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणे ही केवळ त्याच्यासाठीच नव्हे, तर महाविद्यालय, विद्यापीठ आणि संपूर्ण जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब आहे. त्याची ही कामगिरी इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल.”

रोहीतच्या या उल्लेखनीय यशाबद्दल गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे, प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे आणि कुलसचिव डॉ. अनिल हिरेखण यांनी त्याचे अभिनंदन करून इंग्लंडमधील स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत देश, विद्यापीठ आणि गडचिरोली जिल्ह्याचे नाव अधिक उज्ज्वल करण्यासाठी शुभेच्छा दिल्या.

गोंडवाना विद्यापीठातील विद्यार्थ्यांची राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील वाढती कामगिरी ही विद्यापीठातील गुणवत्तापूर्ण शिक्षण, क्रीडा संस्कृती आणि विद्यार्थ्यांमधील प्रतिभेला मिळणाऱ्या प्रोत्साहनाची साक्ष असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

Gadchiroli cricket playerIndian cricket team
Comments (0)
Add Comment