लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
चंद्रपूर : ब्रह्मपुरी वनपरिक्षेत्रात वाढत्या वाघ-मानव संघर्षामागे केवळ ‘नरभक्षक’ ही पारंपरिक संकल्पना नसून, तीव्र उष्णतेमुळे वाघांच्या शरीरावर व मानसिक स्थितीवर होणारे दुष्परिणाम हे प्रमुख कारण असल्याचे धक्कादायक वैज्ञानिक विश्लेषण समोर आले आहे. यंदाच्या उन्हाळ्यात ४५ ते ४७ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचलेल्या तापमानाने जंगलातील परिसंस्था अक्षरशः होरपळून निघाली असून, त्याचा थेट परिणाम वाघांच्या वर्तनावर होत असल्याचे वन्यजीव तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे.
वन्यजीव व्यवस्थापन आणि प्राणिशास्त्राच्या अभ्यासानुसार वाघ हा ‘होमियोथर्मिक’ म्हणजे शरीराचे तापमान स्थिर ठेवणारा प्राणी आहे. मात्र, मानवाप्रमाणे त्याच्या शरीरात घामाच्या ग्रंथी नसल्याने तो उष्णता बाहेर टाकण्यासाठी प्रामुख्याने धापा टाकणे (Panting) आणि पाण्यात बसून राहणे या नैसर्गिक प्रक्रियांवर अवलंबून असतो. परंतु जेव्हा बाह्य तापमान ४७ अंशांपर्यंत झेपावते आणि पाण्याचे स्रोत आटतात, तेव्हा वाघाच्या शरीरातील तापमान नियंत्रण प्रणाली कोलमडते. यालाच ‘हायपरथर्मिया’ किंवा ‘हिट स्ट्रेस’ म्हटले जाते.
तज्ज्ञांच्या मते, अशा स्थितीत वाघांच्या शरीरात कॉर्टिसोल आणि अॅड्रिनालिनसारख्या स्ट्रेस हार्मोन्सची पातळी झपाट्याने वाढते. त्यामुळे त्यांची मज्जासंस्था असंतुलित होऊन ते अत्यंत चिडचिडे, आक्रमक आणि असामान्य वर्तन करणारे बनतात. अगदी किरकोळ हालचाल किंवा अचानक समोर आलेली मानवी उपस्थितीदेखील त्यांच्यासाठी ‘ट्रिगर’ ठरू शकते.
विशेष म्हणजे, उन्हाळ्यात जंगलात सुरू असलेल्या तेंदूपत्ता संकलनामुळे मानव आणि वाघ यांचा संपर्क वाढत आहे. ज्या दाट सावलीच्या भागात किंवा ओढ्यांच्या काठावर वाघ उष्णतेपासून बचावासाठी आसरा घेतात, त्याच परिसरात तेंदूपत्ता मोठ्या प्रमाणात आढळतो. परिणामी, दोघेही एकाच सूक्ष्म अधिवासात (Micro-habitat) समोरासमोर येतात.
तेंदूपत्ता गोळा करताना महिला आणि मजूर जमिनीकडे वाकून काम करतात. वन्यजीव अभ्यासकांच्या मते, वाघाची दृष्टी प्रामुख्याने हालचाल आणि शरीराच्या आकारावर आधारित असते. वाकलेली मानवी आकृती ही त्याला चार पायांच्या नैसर्गिक भक्ष्यासारखी भासू शकते. आधीच उष्णतेच्या ताणाने अस्वस्थ झालेला वाघ अशा वेळी क्षणाचाही विलंब न करता हल्ला करण्याची शक्यता वाढते.
संशोधन संस्थांच्या निरीक्षणानुसार, तीव्र उन्हाळ्यात वाघांच्या शरीरातील ‘स्ट्रेस हार्मोन्स’चे प्रमाण असामान्यरीत्या वाढते. पाण्याचे स्रोत आटल्यामुळे अनेक वाघ जंगलाच्या सीमावर्ती भागात, शेतांमध्ये आणि मानवी वस्त्यांच्या दिशेने फिरू लागतात. विशेषतः आईपासून वेगळे झालेले तरुण आणि अनुभवहीन वाघ मुख्य अधिवासात टिकू न शकल्याने मानवी भागांच्या जवळ आश्रय घेतात. त्यामुळे संघर्षाची शक्यता अधिक तीव्र बनते.
वन विभागातील अधिकाऱ्यांच्या मते, ब्रह्मपुरी आणि चंद्रपूर परिसरात सध्या व्याघ्र घनता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे जंगलातील नैसर्गिक कॉरिडॉरवर प्रचंड ताण निर्माण झाला असून, वाघांच्या स्थलांतराच्या मार्गांमध्ये मानवी हस्तक्षेप वाढल्याने संघर्ष टोकाला पोहोचत आहे.
वन्यजीव व्यवस्थापन क्षेत्रात अशा वाघांना ‘ट्रांझिएंट टायगर्स’ म्हणजे सतत अधिवास बदलणारे वाघ असे संबोधले जाते. त्यामुळे प्रत्येक हल्ल्यामागे ‘नरभक्षक’ ही एकच संकल्पना लावण्याऐवजी हवामान बदल, अतिउष्णता, पाण्याची टंचाई आणि मानवी हस्तक्षेप या घटकांचा वैज्ञानिक पद्धतीने विचार करण्याची गरज असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
ही माहिती डॉ. रविकांत एस. खोब्रागडे, पशुवैद्यकीय अधिकारी (वन्यजीव) तथा जलद बचाव गट प्रमुख, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प यांनी दिली आहे.