लसीकरणानंतर दोन महिन्यांच्या बाळाचा मृत्यू; मृत्यूचे गूढ कायम

कपेवंचातील धक्कादायक घटना; पालकांचा आरोग्य यंत्रणेवर गंभीर आरोप, शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा...

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

अहेरी : नियमित लसीकरणानंतर अवघ्या दोन महिन्यांच्या बाळाचा मृत्यू झाल्याने कपेवंचा परिसरात खळबळ उडाली आहे. ७ सप्टेंबर रोजी लसीकरण झाल्यानंतर बाळाला ताप आला आणि त्याच रात्री त्याचा मृत्यू झाल्याचा दावा पालकांनी केला आहे. मात्र, बाळाचा मृत्यू नेमका लसीकरणामुळे झाला की अन्य वैद्यकीय कारणामुळे, हे अद्याप स्पष्ट झालेले नसून शवविच्छेदन अहवालानंतरच त्याचे कारण स्पष्ट होणार आहे.

कपेवंचा येथे ७ सप्टेंबर रोजी आरोग्य विभागामार्फत नियमित लसीकरण मोहीम राबविण्यात आली. याच मोहिमेत संबंधित बाळाचेही लसीकरण करण्यात आले. त्यानंतर बाळाला ताप आल्याचे पालकांचे म्हणणे आहे. रात्रीच्या सुमारास बाळाची प्रकृती खालावली आणि त्याचा मृत्यू झाला. ८ सप्टेंबर रोजी सकाळी ही घटना उघडकीस आली.

रात्री मदतीसाठी आरोग्य कर्मचारी उपलब्ध नसल्याचा आरोप

बाळाची प्रकृती बिघडल्यानंतर रात्रीच्या वेळी गावात आशा सेविका अथवा आरोग्यसेविका उपलब्ध नव्हत्या. त्यामुळे बाळाला वेळीच प्राथमिक वैद्यकीय मदत मिळाली नाही, असा गंभीर आरोप पालकांनी केला आहे. दुर्गम भागातील आरोग्य यंत्रणेची आपत्कालीन परिस्थितीतील तत्परता यामुळे पुन्हा एकदा ऐरणीवर आली आहे.

घटनेची माहिती मिळताच पेरमिली प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांचे पथक ८ सप्टेंबर रोजी सकाळी कपेवंचा येथे दाखल झाले. त्यानंतर बाळाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी अहेरी उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला. दुपारी सुमारे ३ वाजता रुग्णवाहिकेतून मृतदेह अहेरी येथे पोहोचला.

मात्र, शवविच्छेदनासाठी मृतदेह रुग्णालयात नेताना आरोग्य विभागाचा एकही कर्मचारी सोबत उपस्थित नव्हता, असा आरोप पालकांनी केला आहे. या प्रकाराबाबतही आरोग्य विभागाकडून स्पष्टीकरण अपेक्षित आहे.

लसीकरण की अन्य कारण? अहवालानंतरच उलगडा

बाळाचा मृत्यू लसीकरणानंतर झाला असला, तरी लसीकरण आणि मृत्यू यांच्यात थेट कारणसंबंध असल्याचे सध्या निश्चितपणे सांगता येणार नाही. मृत्यूचे वैद्यकीय कारण शवविच्छेदन अहवाल आणि चौकशीअंती स्पष्ट होणार आहे.

दरम्यान, दूध श्वासनलिकेत जाणे किंवा दूध श्वासावाटे फुफ्फुसात जाणे, यासारख्या कारणांमुळेही लहान बाळाच्या प्रकृतीवर गंभीर परिणाम होऊ शकतो. बाळाला चुकीच्या स्थितीत दूध पाजल्यास अशा प्रकारचा धोका निर्माण होऊ शकतो, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. किरण वानखेडे यांनी दिली.

“या बाळाच्या मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतरच स्पष्ट होईल. मात्र, शवविच्छेदनासाठी मृतदेह पाठविताना आरोग्य विभागाचा कर्मचारी सोबत असणे गरजेचे होते.”

— डॉ. किरण वानखेडे, तालुका आरोग्य अधिकारी, अहेरी

बाळाचे नामकरणही झाले नव्हते…

मृत बाळाची आई सुनीता शामरा तलांडी यांची ही दुसरी प्रसूती होती. बाळ अवघे दोन महिन्यांचे होते. विशेष म्हणजे, बाळाचे अद्याप नामकरणही झाले नव्हते, अशी माहिती कुटुंबीयांनी दिली. या घटनेने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

चौकशी समिती गठित

घटनेची गंभीर दखल घेत आरोग्य विभागाने चौकशी समिती गठित केली आहे. लसीकरणानंतर बाळाची प्रकृती का खालावली, त्याला वेळेत वैद्यकीय मदत मिळाली का, लसीकरणाची प्रक्रिया नियमानुसार झाली का आणि मृत्यूचे नेमके वैद्यकीय कारण काय, या सर्व बाबींची चौकशी होणार आहे.

शवविच्छेदन अहवाल आणि चौकशी समितीच्या निष्कर्षानंतरच या दुर्दैवी मृत्यूमागचे खरे कारण स्पष्ट होणार आहे.

Aheri child deathAheri hospitalGadchiroli health issues
Comments (0)
Add Comment