लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली : शहरांमध्ये मिळणाऱ्या शैक्षणिक सुविधा आता ग्रामीण भागातही पोहोचाव्यात, यासाठी शासनाकडे केवळ अपेक्षा व्यक्त न करता ग्रामस्थांनी स्वतः पुढाकार घेत उभारलेली पळसगावची ‘जनकल्याणम्’ अभ्यासिका ग्रामीण महाराष्ट्रासाठी अनुकरणीय ठरणारी आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी केले.
आरमोरी तालुक्यातील पळसगाव येथे लोकसहभागातून साकारलेल्या या अभ्यासिकेचे लोकार्पण जिल्हाधिकारी पंडा यांच्या हस्ते करण्यात आले. या उपक्रमामुळे पळसगावसह परिसरातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा, उच्च शिक्षण आणि विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या तयारीसाठी गावातच शांत, शिस्तबद्ध आणि अनुकूल वातावरण उपलब्ध झाले आहे.
गावकऱ्यांच्या पुढाकाराला सहपालकमंत्र्यांची दाद..
लोकार्पण सोहळ्यानिमित्त सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी व्हिडिओ संदेशाद्वारे पळसगावच्या ग्रामस्थांचे अभिनंदन केले.गावाच्या विकासासाठी शासनाच्या मदतीची वाट पाहण्याऐवजी ग्रामस्थांनी एकत्र येऊन उभारलेली अभ्यासिका ही लोकसहभागाची ताकद दाखवून देणारी आहे, असे त्यांनी नमूद केले.
ही सुविधा केवळ पळसगावपुरती मर्यादित न राहता जिल्ह्यातील अन्य गावांसाठीही प्रेरणास्थान ठरावी, अशी अपेक्षा व्यक्त करताना अशाच प्रकारचे शैक्षणिक उपक्रम इतर गावांमध्येही उभे राहतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
‘अभ्यासिकेची दारे उघडली; आता यशाची पायवाट विद्यार्थ्यांनी चालावी’…
लोकार्पणानंतर जिल्हाधिकारी पंडा यांनी अभ्यासिकेची पाहणी केली. तसेच ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी व अपेक्षा जाणून घेतल्या.
अभ्यासिका म्हणजे केवळ टेबल-खुर्च्या असलेली जागा नाही; ती विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना दिशा देणारे व्यासपीठ आहे, असे सांगत त्यांनी विद्यार्थ्यांनी या सुविधेचा पुरेपूर वापर करण्याचे आवाहन केले.
नियमित अभ्यासाची सवय, वेळेचे नियोजन, शिस्त आणि स्पर्धात्मक वातावरण या बाबी विद्यार्थ्यांच्या यशासाठी महत्त्वाच्या आहेत. गावातच अशी सुविधा उपलब्ध झाल्याने विद्यार्थ्यांनी तिचा उपयोग करून स्पर्धा परीक्षा, उच्च शिक्षण तसेच विविध करिअरच्या संधींसाठी स्वतःला तयार करावे, असे पंडा यांनी सांगितले.
ग्रामीण आणि दुर्गम भागातील विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता व क्षमता कमी नाही. योग्य वातावरण, मार्गदर्शन आणि संधी मिळाल्यास याच भागातील विद्यार्थी विविध क्षेत्रांत मोठे यश मिळवू शकतात, असेही त्यांनी स्पष्ट केले.
अभ्यासिकेसाठी सौरऊर्जेचीही जोड..
विद्यार्थ्यांना सातत्याने अभ्यास करता यावा आणि अभ्यासिकेच्या वीजखर्चातही बचत व्हावी, यासाठी सौरऊर्जा यंत्रणा उपलब्ध करून देण्याबाबत आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. अभ्यासिकेची स्वच्छता, देखभाल आणि व्यवस्थापन ही केवळ एखाद्या व्यक्तीची जबाबदारी न राहता ग्रामस्थ व विद्यार्थ्यांनी सामूहिकपणे ती जपावी. उपलब्ध सुविधांचा योग्य वापर करून अधिकाधिक विद्यार्थ्यांना त्याचा लाभ मिळेल, यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
पळसगावचा प्रयोग, इतर गावांसाठी संदेश..
ग्रामीण विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीत अडथळा ठरणाऱ्या ‘सुविधांच्या अभावाला’ पळसगावने लोकसहभागातून उत्तर दिले आहे. गावातीलच जागेत, गावकऱ्यांच्या सहभागातून आणि विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी उभारलेली ‘जनकल्याणम्’ अभ्यासिका आता पळसगावच्या शैक्षणिक ओळखीचा नवा अध्याय ठरण्याची अपेक्षा आहे.
यावेळी वडसा उपविभागीय अधिकारी प्रसेनजित प्रधान, आरमोरी तहसीलदार उषा चौधरी, गटविकास अधिकारी मंगेश आरेवार, नायब तहसीलदार दोनाडकर, सहायक गटविकास अधिकारी कुर्झेकर यांच्यासह ग्रामस्थ, विद्यार्थी आणि नागरिक उपस्थित होते..