लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
चामोर्शी : वाघोली शिवारात धारदार शस्त्राने घाव घालून करण्यात आलेल्या तरुणाच्या हत्येप्रकरणी पोलिसांच्या तपासाला आता महत्त्वाचा धागा मिळाला आहे. मृताची ओळख नंदकिशोर मोतीलाल मिश्रा उर्फ बंटी (३४), रा. मूल, जि. चंद्रपूर अशी पटली असून, त्याच्या मृत्यूपूर्वी झालेल्या फोन संपर्काची माहिती तपासाच्या केंद्रस्थानी आली आहे.
७ सप्टेंबरच्या रात्री चामोर्शी-मूल मार्गालगत वाघोली शिवारात रस्त्यापासून सुमारे शंभर मीटर अंतरावर रक्ताच्या थारोळ्यात नंदकिशोरचा मृतदेह आढळून आला होता. डोक्यात धारदार शस्त्राने वार करण्यात आल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले होते. सुरुवातीला मृताची ओळख पटत नसल्याने पोलिसांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले होते.
तपासाची चक्रे फिरवत पोलिसांनी मृताची ओळख पटविली. नंदकिशोर हा मूल येथे मोबाइल दुरुस्तीचे काम करीत असल्याची माहिती पुढे आली. त्याच्या मृत्यूपूर्वी कोणाशी संपर्क झाला होता, तो चामोर्शी परिसरात कशासाठी आला होता आणि शेवटचा फोन नेमका कोणाला झाला होता, याचा तपास आता पोलिसांकडून केला जात आहे.
मृत्यूपूर्वीचा फोन संपर्क, घटनास्थळी आढळलेले पुरावे आणि संबंधित व्यक्तींची चौकशी यावरून हत्येचे नेमके कारण व आरोपीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न पोलिसांकडून सुरू आहे. त्यामुळे या प्रकरणातील पुढील तपासात फोन कॉल हा महत्त्वाचा दुवा ठरण्याची शक्यता आहे.
नंदकिशोरच्या वडिलांचे यापूर्वीच निधन झाले असून, त्याच्या मृत्यूमुळे मूल परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.