Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

शाश्वत विकासासाठी निसर्गाचे पावित्र्य जपणे आवश्यक : राज्यपाल भगत सिंग कोश्यारी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

मुंबई डेस्क, दि. २२ मार्च: भारत हा अनादी काळापासून निसर्ग पूजक देश आहे. पृथ्वी, पाणी, तेज, वायू व आकाश या पंचमहाभूतांना या देशाने देवत्व दिले आहे. आज पर्यावरण– हवामानातील मोठ्या बदलांमुळे अनेक संकटे निर्माण होत आहे. या संकटांवर मात करून शाश्वत विकास साधायचा असेल तर सर्वांना निसर्गाचे पावित्र्य जपावे लागेल, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे केले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

गोवर्धन इको व्हिलेज व सिटी युनिव्हर्सिटी ऑफ न्युयॉर्क यांनी जागतिक जल दिनाचे औचित्य साधून पर्यावरण बदल या विषयावर आज (दि. २२) भारत – अमेरिका परिषदेचे आयोजन केले होते, त्यामध्ये दूरस्थ माध्यमातून सहभागी होताना राज्यपाल बोलत होते.

या ऑनलाईन परिषदेत गोवर्धन इको व्हिलेज प्रकल्पाचे संस्थापक राधानाथ स्वामी, अमेरिकेचे मुंबईतील वाणिज्यदूत डेव्हिड रांझ, उद्योगपती अजय पिरामल, भारताचे न्युयॉर्क येथील वाणिज्यदूत रणधीर जयस्वाल तसेच सिटी युनिव्हर्सिटी ऑफ न्यूयॉर्कचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

भारतात पृथ्वीला माता म्हणतात आणि देशाला मातृभूमी म्हणतात. मुलगा ज्याप्रमाणे आपल्या आईचे शोषण करत नाही त्याप्रमाणे मनुष्याने पृथ्वीचे तसेच निसर्गाचे शोषण न करता तिचे पावित्र्य जपले पाहिजे असे सांगून भारत व अमेरिका ही दोन मोठी लोकशाही राष्ट्रे शाश्वत विकासासाठी एकत्र कार्य करीत आहेत, ही आश्वासक बाब असल्याचे राज्यपालांनी सांगितले. राधानाथ स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली गाल्तरे, पालघर जिल्ह्यातील गोवर्धन इको व्हिलेज ही संस्था शाश्वत विकासासाठी चांगले कार्य करीत असल्याचे राज्यपालांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजच जलशक्ती अभियानाचे उद्घाटन केल्याचे सांगून प्रत्येक घरी नळाद्वारे पिण्याचे पाणी देण्यासाठी तसेच स्वच्छ उर्जा निर्मितीसाठी भारत कटिबद्ध असल्याचे राज्यपालांनी सांगितले.

Comments are closed.