Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

जेष्ठ साहित्यिक तू. शं. कुलकर्णी यांचे वृद्धपकाळाने निधन

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

नांदेड, दि. १० एप्रिल: जेष्ठ साहित्यिक तू शं कुलकर्णी यांचे आज वृद्धपकाळाने नांदेड येथे दुःखद निधन झाले. कळमनुरी तालुक्यातील डोंगरकडा येथे जन्मलेले तू.शं कुलकर्णी यांनी मराठी साहित्याची शेवटपर्यंत सेवा केली. ते ९० वर्षांचे होते. साहित्य वर्तुळात ते तूशं नावाने प्रसिद्ध होते. त्यांच्या इच्छेनुसार मृत्यूनंतर नांदेडच्या डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात देहदान करण्यात आले. मराठवाडा विद्यपीठात मराठीचे विभागप्रमुख होते. तत्पूर्वी हैद्राबाद संस्थान व महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागात ही त्यांनी आपली सेवा दिली.

मराठी अभ्यास मंडळाचे सदस्य, महाराष्ट्र राज्य ग्रंथ पुरस्कार समिती, राज्य ग्रंथालय समिती, साहित्य संस्कृती मंडळ या आणि इतर अनेक साहित्य विषयक समिती मध्ये त्यांनी महत्वपूर्ण जबाबदाऱ्या सांभाळल्या. नवलेखक अनुदान समिती मध्ये तज्ञ परीक्षक, महाराष्ट्र राज्य नाट्य प्रयोगाचे परीक्षक, १९९५ पासून महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्य, मराठवाडा साहित्य परिषदेच्या प्रतिष्ठान या मासिकाचे संपादक व मसाप चे कार्यवाह म्हणून १५ वर्ष सतत जबाबदारी सांभाळली. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे सदस्य व कार्यवाह म्हणूनही ते कार्यरत होते. २००२ साली औरंगाबाद येथे झालेल्या २३ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

तृणाची वेदना, ग्रीष्मारेखा, अखेरच्या वळणावर हे कथासंग्रह, कानोसा हा कविता संग्रह, बाबा पृथ्वीसिंह आझाद यांच्या जीवनकार्यावरील क्रांती मार्गावरील प्रवासी, स्वातंत्रोत्तर मराठी कविता या साहित्य कृतीबरोबरच, वाङ्मय (वाङ् मय) कोशासाठी लेखन, महाराष्ट्र टाईम्स, लोकसत्ता, मराठवाडा इत्यादी नियतकालिकांसाठी सातत्याने समीक्षात्मक लेखन, लियो ह्युबरमन यांच्या मॅन्स वर्ल्डली गुड्स या साहितकृतीचा मराठी अनुवाद, दलाई लामा चे मराठी भाषांतर, मन के जिते जित या महाप्रज्ञ युवाचार्य जैन ग्रंथाचा मराठी अनुवाद ही त्यांनी केला होता. त्यांच्या निधनाबद्दल साहित्य, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील अनेकांनी दुःख व्यक्त केलं आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.