राज्यात १५ दिवसांचा लॉकडाऊन, आरोग्यमंत्री टोपे यांचे संकेत
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
जालना, दि ११ एप्रिल: सर्वांची सहमती मिळाली तर राज्यात १५ दिवसांचा लॉकडाऊन राहील, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. ते जालन्यात पत्रकारांशी बोलत होते.
मुख्यमंत्र्यांनी सर्व घटकांशी चर्चा केली असून लॉकडाऊनमध्ये टास्क फोर्सची भूमिका महत्त्वाची असते त्यामुळे टास्क फोर्स सोबत होणाऱ्या बैठकीत त्यांनी केलेल्या सूचना आवर्जून पाळून त्याबाबत मंत्रिमंडळ निंर्णय घेईल असंही त्यांनी म्हटल आहे. आज किंवा उद्या लगेच लॉकडाऊन लागणार नसून संपूर्ण नियोजन झाल्यानंतरच लॉकडाऊनची घोषणा केली जाईल असेही त्यांनी सांगितलं आहे.
राज्यात ऑक्सीजनचे उत्पादन बाराशे मेट्रिक टन होत असून हा सर्व साठा मेडिकलसाठी वापरला जात आहे. एखाद्या उद्योजकाने ऑक्सिजन साठवण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल असंही आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणाले. ज्या कोरोना बाधित रुग्णाला रेमडेसीवीरची गरज आहे त्यालाच यापुढे इंजेक्शन दिले जाईल असंही ते म्हणाले. कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी वेगळा स्टाफ आणि लसीकरणासाठी वेगळा स्टाफ नेमण्यात आला असून आरोग्य विभागात रिक्त जागा भरणे सुरू आहे अशी माहिती देखील त्यांनी दिली आहे. यापुढे राज्यात रेमडीसीवीर इंजेक्शनची कमतरता येणार नसून कंपनी थेट जिल्हाधिकाऱ्यांना या इंजेक्शनचा पुरवठा करणार असून गरज असलेल्या रुग्णांना जिल्हाधिकारी हे इंजेक्शन पुरवतील याची व्यवस्था आम्ही करत असल्याचं सांगत रेमडीसीवीरच्या रेटवर सुद्धा आम्ही नियंत्रण मिळवत असल्याच त्यांनी यावेळी सांगितले.
Comments are closed.