Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

कोरोना संकटकाळात बेरोजगारांना मोठा दिलासा.

Get real time updates directly on you device, subscribe now.

1 लाख 15 हजार बेरोजगारांना मिळाला रोजगार – कौशल्य विकास मंत्री श्री. नवाब मलिक

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क:

मुंबई डेस्क, दि. 06 नोव्हें. : कोरोनाच्या संकटामुळे बेरोजगारीची समस्या निर्माण झाली आहे. पण असे असतानाही कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागाने लॉकडाऊनच्या काळात जिल्ह्याजिल्ह्यांमध्ये आयोजित केलेले ऑनलाईन रोजगार मेळावे तसेच महास्वयंम वेबपोर्टलमार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांच्या आधारे लॉकडाऊनच्या काळात ऑक्टोबरअखेरपर्यंत एकुण 1 लाख 15 हजार 928 इतक्या बेरोजगारांना रोजगार मिळाला आहे, अशी माहिती विभागाचे मंत्री श्री. नवाब मलिक यांनी दिली.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

 फक्त ऑक्टोबर महिन्यात 30 हजार 500 बेरोजगारांना रोजगार मिळाला आहे. चालू वर्षात जानेवारी ते ऑक्टोबर दरम्यान एकूण 1 लाख 48 हजार 343 बेरोजगारांना रोजगार मिळाला आहे, अशी माहिती मंत्री श्री. मलिक यांनी दिली.

मंत्री श्री. मलिक म्हणाले की, बेरोजगार उमेदवार आणि उद्योजक यांच्यामध्ये सांगड घालण्यासाठी कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागाने https://rojgar.mahaswayam.gov.in हे वेबपोर्टल सुरु केले आहे. या वेबपोर्टलवर बेरोजगार उमेदवार आपले शिक्षण, कौशल्ये, अनुभव आदी माहीतींसह नोंदणी करतात. त्याचबरोबर कुशल उमेदवारांच्या शोधात असलेल्या कंपन्या, उद्योजक, कॉर्पोरेट्स हे सुद्धा या वेबपोर्टलवर नोंदणी करुन त्यांना हवे असलेले कुशल उमेदवार शोधू शकतात. अशा प्रकारे बेरोजगार आणि उद्योजक यांच्यामध्ये समन्वय घडवून आणण्याचे काम या वेबपोर्टलमार्फत करण्यात येते.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

मुंबईत ऑक्टोबरमध्ये 16 हजार जणांना रोजगार

 माहे ऑक्टोबरमध्ये विभागाकडे 55 हजार 890 इतक्या नोकरीइच्छूक उमेदवारांनी नवीन नोंदणी किंवा पुनर्नोंदणी केली आहे. यात मुंबई विभागात 20 हजार 793, नाशिक विभागात 5 हजार 375, पुणे विभागात 14 हजार 577, औरंगाबाद विभागात 9 हजार 915, अमरावती विभागात 2 हजार 717 तर नागपूर विभागात 2 हजार 513 बेरोजगार उमेदवारांनी नोंदणी केली.

 माहे ऑक्टोबरमध्ये कौशल्य विकास विभागाच्या विविध उपक्रमांद्वारे 30 हजार 500 उमेदवार नोकरीस लागले. यामध्ये मुंबई विभागात सर्वाधिक 16 हजार 349, नाशिक विभागात 1 हजार 458, पुणे विभागात 7 हजार 565, औरंगाबाद विभागात 3 हजार 106, अमरावती विभागात 1 हजार 145 तर नागपूर विभागात 877 इतके बेरोजगार उमेदवार नोकरीस लागले.

ऑनलाईन मुलाखती

 कौशल्य विकास विभागाने लॉकडाऊनच्या काळात राज्यभरात पंडित दीनदयाळ उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळाव्यांची मोठी मोहीम सुरु केली आहे. प्रत्येक जिल्हास्तरावर ऑनलाईन रोजगार मेळावे घेण्यात येत आहेत. व्हॉटस्ॲप, स्काईप, झूम इत्यादी माध्यमांद्वारे ऑनलाईन मुलाखती घेण्यात येतात. अर्ज केलेल्या सर्व उमेदवारांना रोजगार मिळवून देण्यासाठी विभागामार्फत प्रयत्न करण्यात येत आहेत, असे मंत्री श्री. मलिक यांनी सांगितले.

नोकरीइच्छूक तरुणांनी नोंदणी करण्याचे आवाहन

 मंत्री श्री. मलिक म्हणाले की, यापुढील काळातही रोजगार उपलब्धतेसाठी विभागामार्फत मोहीम पातळीवर काम केले जाईल. नोकरीइच्छूक तरुणांनी https://rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर मोबाईल क्रमांक, ईमेल आयडी आणि आधार क्रमांकासह नोंदणी करावी. आधी नोंदणी केलेल्या उमेदवारांनी आपली माहिती अद्ययावत करावी, तसेच कुशल उमेदवारांच्या शोधात असलेले खासगी, सार्वजनिक क्षेत्रातील उद्योजक, कॉर्पोरेट्स यांनीही या वेबपोर्टलवर नोंदणी करावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.