Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

महाराष्ट्राच्या चित्ररथाचे कलावंत कौतुकास पात्र – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

प्रजासत्ताक दिनी चित्ररथाचे उत्कृष्ट सादरीकरण करणाऱ्या कलावंतांचा सत्कार

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्युज नेटवर्क

मुंबई, दि. 21 मार्च :-भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त नवी दिल्लीत कर्तव्य पथावर होणाऱ्या संचलनात कलावंतांनी कमी कालावधीत उत्कृष्ट कामगिरी सादर करीत द्वितीय क्रमांक पटकावला. ही महाराष्ट्रासाठी गौरवाची बाब असून या चित्ररथाच्या सादरीकरणात सहभागी कलावंत कौतुकास पात्र आहेत, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढले. राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे प्रजासत्ताक दिनानिमित्त नवी दिल्ली येथील कर्तव्य पथावर राज्याचा ‘साडेतीन शक्तिपीठे : नारीशक्ती’ या चित्ररथाचे उत्कृष्ट सादरीकरण करणाऱ्या तसेच राज्यगीताची संगीतमय निर्मिती करणाऱ्या कलावंतांचा सत्कार सोहळा आज मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे आदी उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते चित्ररथ निर्मिती कलावंत, चित्ररथाबरोबर नृत्य करणारे कलांवत, राज्यगीताचे कलांवत आणि महाराष्ट्र वाद्य गीत सादर करणारे गायक नंदेश उमप, गायिका वैशाली सामंत, वैशाली माडे, कौशल इनामदार, कमलेश भडकमकर, प्राची गडकरी, पंकज इंगळे, आनंदी जोशी, विशाल भांगे आदींचा सत्कार करण्यात आला. यानिमित्त ‘जय जय महाराष्ट्र माझा’ हा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, देशात महाराष्ट्र हे अग्रेसर राज्य आहे. महाराष्ट्रातर्फे कर्तव्य पथावर सादर झालेल्या चित्ररथाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपिठाबरोबरच नारी शक्तीच्या सन्मानाची माहिती देशभरात पोहोचली. अशा प्रकारच्या सत्कार सोहळ्यांमुळे समाजात सकारात्मक संदेश पोहोचवला जातो. यातून अनेकांना प्रेरणा मिळते. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे गडकोट, किल्ले राज्याचे ऐश्वर्य आणि संपत्ती आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषकाचे यंदा ३५० वे वर्ष आहे. यानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या माध्यमातून राज्यात विविध कार्यक्रम आयोजित करावेत. त्या माध्यमातून नव्या पिढीपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य पोहोचवावे, असे सांगत गडकोट, किल्ल्यांच्या संवर्धनासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात पुरेशी तरतूद करण्यात आली असल्याचे मुख्यमंत्री  शिंदे यांनी सांगितले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

सांस्कृतिक कार्य मंत्री मुनगंटीवार म्हणाले की, राज्यातील साडेतेरा कोटी नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करण्याची शक्ती आपल्या राज्यगीतात आहे. राज्यातील कलावंतांनी कमी कालावधीत चित्ररथ सादर केला. त्याबरोबरच त्यांनी संपूर्ण देशातून दुसरा क्रमांक पटकावला ही अभिमानाची बाब आहे. मंत्रालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी सांस्कृतिक विभागातर्फे स्पर्धांचे आयोजन करण्याचीही सूचना त्यांनी केली.
प्रधान सचिव खारगे म्हणाले की, भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात महाराष्ट्राच्या चित्ररथाने दुसरा क्रमांक पटकावला. त्याबरोबरच शाहीर साबळे यांनी घराघरात पोहोचविलेल्या ‘जय जय महाराष्ट्र माझा’ हे गीत राज्याने राज्यगीत म्हणून स्वीकारले. या पार्श्वभूमीवर कलावंतांचा सत्कार सोहळा आयोजित केला आहे. गायिका वैशाली सामंत यांनी मनोगत व्यक्त केले. ‘जय जय महाराष्ट्र माझा’ हा सांस्कृतिक कार्यक्रमात गायिका वैशाली सामंत, नंदेश उमप, वैशाली माडे, आनंदी जोशी, विशाल भांगे आदींनी विविध गीते सादर केली. त्यांनी ‘बहु असोत सुंदर संपन्न की महा प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा’, ‘मंगल देशा, पवित्रा देशा, महाराष्ट्र देशा प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा’ आदी गीते सादर करीत उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. यावेळी लोकप्रतिनिधी, मंत्रालयातील अधिकारी, कर्मचारी, नागरिक उपस्थित होते.

हे पण वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.