Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

अहेरीच्या वार्षिक आमसभेतील बहुतांशी समस्यांचे निराकरण तर काही अनुत्तरीत

लोकस्पर्श न्युज नेटवर्क

अहेरी, 13 एप्रिल : जिल्ह्यातील राजकारणात ठसा उमटविणाऱ्या “अहेरी” पंचायत समितीची वार्षिक आमसभा स्थानिक भुजंगरावपेठा येथील इंडियन फंक्शन हॉलमध्ये आमदार धर्मराव बाबा आत्राम यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. तालुक्यातून आलेल्या नागरिकांनी, लोकप्रतिनिधींनी त्यांच्या अंतर्गत गावातील मागील सभेत पूर्ण न झालेल्या समस्यांचा व चालू वर्षातील समस्यांचा पाढा वाचला. यात उपस्थित अधिकाऱ्यांकडून समाधान करण्यात आले. मात्र काही विभागातील अधिकारीच गैरहजर असल्याने काही समस्यांवर तोडगा अनुत्तरीत राहिला.
अकरा वाजताची वेळ दिलेली आमसभा दीड वाजता सुरू झालेल्या सभेचे आयोजक तथा पंचायत समितीचे संवर्ग विकास अधिकारी प्रतीक चन्नावार यांनी सभेतील उपस्थितीत समस्यांबाबत विस्तृत माहिती दिली. सदर आमसभेच्या विचारपिठावर माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्री धर्मरावबाबा आत्राम, माजी पंचायत समिती सदस्य हर्षवर्धन धर्मरावबाबा आत्राम, तथा जिल्हा परिषदेच्या वार्षिक नियोजन समितीचे सदस्य ऋतुराज हलगेकर व पीएसआय गुटे उपस्थित होत्या.

नियमित पाणीपुरवठ्याचे अध्यक्षांचे निर्देश:–
देवलमारी, गुड्डीगुडम, जीमलगट्टा गावातील पाणी पुरवठ्याचा प्रश्न मागील आमसभेपासून अनुत्तरीत होता. त्यावर सात दिवसात तोडगा काढण्याचे निर्देश अध्यक्ष महोदयांनी दिले. आलापल्ली, नागेपल्ली, महागाव खुर्द, अहेरी गुफा, चिंचगुंडी व महागाव बुद्रुक येथील सुद्धा पाण्याच्या समस्येची समस्या लवकर सोडविण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना यावेळी दिले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

स्थानिक श्रीराम चौकातील फलक प्रकरणात तत्कालीन मुख्याधिकाऱ्यावर कारवाईचा प्रश्न, इंदाराम येथील एमआरजीएस अंतर्गत झालेल्या कामांचा मुद्दा,पंचायत समिती अंतर्गत गट्टा येथील जुन्या शौचालयाला रंगरंगोटी करून नवीन शौचालय दाखवून पैसे हडप करण्याचा मुद्दा चार वर्षापासून चौकशीच्या फेऱ्यात असल्याने अध्यक्ष महोदयांनी पंचायत समितीचे सध्याचे व तत्कालीन अभियंता चिवंडे यांना धारेवर धरले. इंदाराम, येदरंगा, व्यंकटरावपेठा व इतर गावातील घरकुल प्रकरणांमध्ये योग्य ती कारवाई त्वरित करण्याचे निर्देश सुद्धा आमदार महोदयांनी दिले.
अनुत्तरीत समस्या “जैसे थे” :—
1) मधुकर सडमेक यांनी अहेरी तालुक्यातील मागील वर्षांमध्ये 1094 घरकुल मंजूर पैकी चालू बांधकामांची स्थिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली. मात्र बांधकामच न करणाऱ्या व पूर्ण रक्कम लाभार्थ्यांना वितरित करणाऱ्या अधिकाऱ्यांवरील कारवाईचा प्रश्न अनुत्तरीत राहिला.
2) उपविभागातील दोन-तीन तालुक्यातील नागरिक कामानिमित्त अहेरीला येतात. मात्र त्यांना अहेरीत एकतरी सार्वजनिक शौचालयाची सोय उपलब्ध कशी होईल? नगरपंचायतीला निर्देश द्याल का? असा प्रश्न मधुकर रापर्तीवार यांनी विचारला. मात्र त्याचे उत्तर उपस्थितांना मिळू शकले नाही.
3) बोरी परिसरातील शेतकऱ्यांचे पीक लोहखनिज वाहनांच्या धुळीमुळे उध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांचा प्रश्न अनुत्तरीत राहिला.चांदेकर ठेकेदाराने तेंदुपत्ता कामाचे पैसे नागरिकांना अजूनही दिले नसल्याची तक्रार सुद्धा महोदयांच्या लक्षात यावेळी आणून देण्यात आली.
वार्षिक आमसभेला तालुक्यातील समस्याग्रस्त नागरिक व सर्व विभागाचे विभाग प्रमुख तथा प्रतिनिधी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन व आभार पंचायत समितीच्या संजू कोठारी व कर्मचाऱ्यांनी केले.

हे पण वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.