Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

भर पावसात…. जिल्हाधिकारी धानाच्या शेतात

श्री पद्धतीने भात रोवणीचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते शुभारंभ

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्युज नेटवर्क

चंद्रपूर, 16 जुलै – दोन दिवसांपूर्वी पूर परिस्थितीच्या उपाययोजनेबाबत ऑनफिल्ड असणारे जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी शनिवारी भर पावसात धानाच्या शेतात हजेरी लावली. यावेळी त्यांच्या हस्ते ‘श्री’ पद्धतीने भात रोवणीचा शुभारंभ करण्यात आला. जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी गौंडपिपरी तालुक्यातील बोरगांव येथील सुरेश भसारकर यांच्या भात खाचरात एस.आर. आय. (श्री) पध्द्तीने भात रोवणीचा शुभारंभ केला. भाताची लागवड रोपे तयार असून पुरेशा पावसाच्या प्रतीक्षेत शेतकरी आहेत. पाण्याची सोय असलेल्या ठिकाणी भात लागवड वेग धरत आहे. जिल्हाधिकारी यांनी स्वतः भात खाचरात शेतकरी, लागवड करणाऱ्या महिला यांच्याशी संवाद साधत भात रोवणी केली.

यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार, उपजिल्हाधिकारी स्नेहल रहाटे, कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. नागदेवते, कृषी उपसंचालक चंद्रकांत ठाकरे, तहसीलदार शुभम बहाकर, उपविभागीय कृषी अधिकारी, गिरीश कुलकर्णी तालुका कृषी अधिकारी सचिन पानसरे तसेच क्षेत्रिय कर्मचारी आणि शेतकरी उपस्थित होते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

जिल्हाधिकाऱ्यांनी तण व्यवस्थापन, माती परीक्षणानुसार सुयोग्य खताचा वापर करण्याबाबत सूचना दिल्या. तसेच सुधारित पद्धतीने भात लागवड करण्याचे शेतकऱ्यांना आवाहन केले.  डॉ नागदेवते यांनी पेर भात, टोकण पद्धतीने भात लागवडीच्या अर्थशास्त्राची माहिती दिली. श्री पद्धतीने लागवड केल्यास पारंपरिक पद्धतीपेक्षा फुटव्यांची संख्या वाढवून 40 ते 50 पर्यंत असल्याने हेक्टरी उत्पन्नात 10 क्विंटल पर्यंत वाढ होत आहे, असे सांगितले.

 जिल्हाधिका-यांची गोंडपिपरी तालुक्यातील सोयाबीन प्रकल्पाला भेट

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी गोंडपिपरी तालुक्यातील तारसा बु. येथे राष्ट्रीय खाद्यतेल अभियान अंतर्गत जसविंदरसिंग सुच्चासिंग पन्नू यांच्या शेतातील सोयाबीन पिकाच्या प्रात्याक्षिक प्रकल्पाला भेट दिली.  सरी वरंब्यावरील सोयाबीन टोकण यंत्राच्या सहाय्याने लागवड करण्यात आलेल्या क्षेत्राची यावेळी त्यांनी पाहणी केली. तसेच कृषी विभागाकडुन मानव विकास योजनेमधून देण्यात आलेल्या टोकण यंत्रांच्या सहायाने पेरणीचे प्रात्याक्षिक जिल्हाधिकाऱ्यांच्या  हस्ते करण्यात आले.

यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार  यांनी सोयाबीन लागवडीच्या तंत्रज्ञानाबद्दल माहिती देऊन शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ करण्यासाठी सोयाबीन पिकाच्या अष्टसूत्रीचा वापर फायदेशीर असल्याचे सांगितले. सोयाबिन पिकावर पुढे येणाऱ्या किडी व रोगापासून संरक्षण करण्यासाठी पिकाच्या पेरणी नंतर 15 दिवसानंतर चिकट सापळे, कामगंध सापळे, पक्षी थांबे, निंबोळी अर्क व दशपर्णी अर्काचा वापर करावा. तसेच खत व्यवस्थापन करताना १२:६१:०० हे खत १०० ग्रॅम अधिक चिलेटेड सुक्ष्म मुलद्रव्य २० ग्रॅमप्रती १० लिटर पाणी या प्रमाणात वापर करण्याबाबत सुचना देण्यात आल्या.
35 दिवसानंतर तण नियंत्रणासाठी निंदनी डवरणी आवश्यकतेनुसार शिफारशीत तण नाशकाचा वापर करण्याचे सांगितले. गोंडपिपरी तालुक्यात एकूण 80 हे. क्षेत्रावर सरी वरांबा वर टोकन सोयाबीन लागवड झाल्याचे तालुका कृषी अधिकारी यांनी सांगितले.

हे पण वाचा :-

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.