Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

डेंग्यू आजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे

आरोग्य विभागाचे आवाहन

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,

चंद्रपूर, 1 ऑगस्ट 2023 ; डेंग्यू हा अतिशय गंभीर आजार आहे. दरवर्षी लाखो लोक या आजाराने ग्रस्त होतात. तर काही लोकांसाठी हा आजार जीवघेणा ठरतो. डेंग्यू ताप हा विशिष्ट विषाणूमुळे होतो. डेंगीचा प्रसार हा ‘एडीस इजिप्ती’ नावाच्या डासांमुळे होतो. या डासांची उत्पत्ती साठवलेल्या स्वच्छ पाण्यात होते. कोणतेही पाणी 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस साठवून ठेवल्यास त्यामध्ये डास अंडी घालतात. त्यानंतरअंड्यांचे रूपांतर डासात होते. कोणतेही साठवलेले पाणी हे 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस साठवून ठेवू नये. याबाबत नागरिकांनी खबरदारी घेणे आवश्यक आहे. डासांची उत्पत्ती कमी करून नियंत्रणात ठेवण्यासाठी जनतेने आरोग्य यंत्रणेला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

जुलै ते ऑक्टोबर हे महिने डेंग्यूच्या डासांना प्रजननासाठी अनुकूल असतात. या काळात पावसामुळे पाणी साचण्याची शक्यता अधिक असते. अशा साचलेल्या पाण्यात डेंग्यूचे डास अंडी टाकतात. या अंडीचे 3 ते 4 दिवसात डासअळीमध्ये रुपांतर होते. पुढील 4-5 दिवसात डासअळीचे रुपांतर कोशमध्ये होते आणि 2 दिवसानंतर कोशमधून प्रौढ डास बाहेर पडतात. डासांचे जीवन 3 ते 4 आठवड्याचे असते, यापैकी पहिले 10 दिवस पाण्यात असतात.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

डेंग्यू आजाराची लक्षणे : संक्रामित एडीस इजिप्ती डासांच्या चाव्यानंतर 5-6 दिवसात डेंग्यूची लागण होते. डेंग्यूताप आणि डेंग्यू रक्तस्त्राव ताप अश्या दोन प्रकारे हा आजार फैलावतो. डेंग्यू रक्तस्त्रावात्मक ताप हा अधिक तीव्र स्वरूपाचा असतो. त्यामुळे मृत्यू ओढावू शकतो. लहान मुलांमध्ये सौम्य स्वरूपाचा ताप असतो. मोठ्या माणसांमध्ये अधिक तीव्रतेचा ताप, सोबत डोके दुखणे, डोळ्याच्या खोबनिमागे दुखणे, अंगदुखी, सांधेदुखी, अशक्तपणा, अंगावर लालरंगाचे चट्टे येवू शकते. अंगदुखी तीव्र स्वरूपात असू शकते, म्हणून याला हाडेमोडणारा ताप असेही म्हणतात. याखेरीज चव आणि भूकनष्ट होणे, मळमळणे आणि उलट्या होणे, पोटात दुखणे आणि श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो.

डेंग्यू आजाराचे निदान : कुठलाही ताप आल्यास नजीकच्या आरोग्य संस्थेत जाऊन डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व आवश्यक त्या चाचण्या करून घ्याव्या. प्रौढ व्यक्तीच्या शरीरात 1,50,000ते 4,50,000 मायक्रोलिटर एवढी प्लेटलेट्सची संख्या असते. डेंग्यू तापामध्ये प्लेटलेट्सची संख्या कमी होते. खाजगी लॅब मध्ये एन. एस. 1 (NS 1) अँटिजेन चाचणी किटद्वारे केली जाते. जर ही चाचणी पॉझेटिव्ह आली तर रुग्णाला संशयित डेंग्यू म्हणून संबोधिले जाते. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, चंद्रपूर येथे सेंटीनेल लॅब शासनाने स्थापित केली आहे. या लॅबमध्ये संशयित डेंग्यू रुग्णांचे रक्त जल नमुने पाठवून एलाईजा टेस्ट केल्या जाते आणि ही टेस्ट पॉझिटिव्ह आल्यास कन्फर्म डेंग्यू म्हटले जाते.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

डेंग्यू आजार झाल्यावर करावयाचे उपाय : ताप असेपर्यंत आराम करावा, ताप कमी होण्यासाठी प्यारासीटामोलच्या गोळ्या घ्याव्यात. ताप अथवा वेदनाशामक म्हणून अस्पिरीन अथवा आयबुप्रोफेन गोळ्या घेऊ नये. नर्जलिकरण होऊ नये याकरिता जलपेयांचा जास्त प्रमाणात सेवन करावे. रक्तस्त्रावची लक्षणे असल्यास रुग्णाला त्वरित रुग्णालयात भरती करावे.

डेंग्यू आजार होऊ नये म्हणून करावयाचे प्रतिबंधात्मक उपाययोजना : अंग पूर्णपणे झकणारे कपडे घालावेत. डास प्रतिरोधक क्रीम, अगरबत्तीचा वापर करावा. निंबाच्या पालांचा धूर करावा. घरांच्या दरवाजे खिडक्यांना जाळी लावावी. घरात साठवलेले अथवा साचलेले पाणी दर आठवड्याला रिकामे करावे. कूलर, फ्रिजच्या खालचे पॅन आणि कुंड्यांच्या खालचे पॅन रिकामे करावे. घराच्या छतावर भंगार सामान, फुटलेले माठ अथवा टायर ठेवू नये. घराच्याबाहेर अडगळीत असलेल्या सामानाची विल्हेवाट लावावी. टाकी, हौदमध्ये असलेले पाणी आठवड्याला रिकामे करावे. आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. या दिवशी घरातील सर्व पाणी साठे रिकामे करून घासून, पुसून ठेवावे व त्यानंतर पाणी भरावे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.