Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

जिल्हाधिकारी संजय मिना महिला व बाल रुग्णालयाला भेट

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,

गडचिरोली, 10 ऑक्टोंबर : जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था तत्पर असावी, रुग्णांना वेळेवर उपचार मिळावेत, यासाठी  जिल्हाधिकारी संजय मिना यांनी  येथील महिला व बाल रुग्णालयास भेट देऊन रुग्णालयाची तपासणी केली. भेटी दरम्यान जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रमोद खंडाते, महिला व बाल रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षिका डॉ. माधुरी किलनाके व रुग्णालयांतर्गत कार्यरत डॉक्टर्स व इतर कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी रुग्णालय प्रशासन, डॉक्टर्स व कर्मचारी यांच्याशी संवाद साधला. प्रसुतीपूर्व व प्रसुतीपश्चात घ्यावयाच्या काळजीबाबत व सेवा सुविधा संबंधी रुग्णालय कटीबध्द आहे. लगतच्या राज्यांतून, जिल्ह्यांवरुन व तालुकास्तरावरुन प्रसुतीरुग्ण संदर्भित होत असल्याने 100 भरती रुग्णसंख्या क्षमता असलेल्या गडचिरोलीच्या महिला व बालरुग्णालयात 200 ते 250 रुग्ण भरती असतात व त्यामुळे उपलब्ध मनुष्यबळावर ताण पडत असल्याचे वैद्यकीय अधिक्षिका डॉ. माधुरी किलनाके यांनी सांगितले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

रुग्णालयाच्या क्षमतेच्या बाहेर जाऊन सुमारे दुप्पट ते अडीच पट रुग्ण रुग्णालयात भरती होत असले तरी अशा परिस्थितीतही रुग्णालयात पुरेसा औषधी साठा व स्वच्छता असल्याची तसेच महिला व बालरुग्णालय अत्याधुनिक उपकरणे व सुविधा यांनी सज्ज असल्याची जिल्हाधिकारी यांनी खात्री केली.
100 खाटांच्या अतिरिक्त एमसीएच विंगचे बांधकाम लवकरात लवकर पूर्ण करण्याबाबत जिल्हाधिकारी यांनी संबंधित अभियंतांना आदेश दिले. त्या अनुषंगाने वर्ग-३ व वर्ग-४ कर्मचाऱ्यांच्या मागणीबाबत प्रस्ताव सादर करण्यासंबंधी जिल्हा शल्य चिकित्सक यांना निर्देश दिले.

रुग्णालयातील दुसरे मॉड्युलर शल्यक्रिया गृह सुरु करण्याबाबत व निर्जंतुकीकरणाबाबत जिल्हाधिकारी यांनी संबंधितांना सुचना दिल्यात. डॉक्टरांनी सकाळी व सायंकाळी आणि गरजेप्रमाणे भरती रुग्णांची तपासणी करुन उपचार करावा व तसेच विशेष नवजात काळजी कक्ष ( एस. एन. सी. यु. ) मधील भरती बालकाकडे विशेष लक्ष देण्याबाबत सांगितले. रुग्णालयाचे विद्युत व अग्नी विरोधी उपाययोजनांचे अन्वेषण पूर्ण झालेले असून त्याचे ना-हरकत प्रमाणपत्र त्वरीत प्राप्त घेण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी निर्देश दिलेत. माता मृत्यू व बाल मृत्यू दर कमी करण्याकरीता सर्व उपाययोजना तसेच सर्व माता मृत्यू व बाल मृत्यू यांचे वेळेत अन्वेषण करुन योग्य त्या उपाययोजना त्वरीत राबविण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.