Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना

जिल्हाधिका-यांनी घेतला अंमलबजावणीचा आढावा.

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

चंद्रपुर,16 जुलै – जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत जिल्हा नियोजन भवन येथे जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय पवार, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक ऋतुराज सुर्या, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त भैयाजी येरमे, नियोजन समितीचे सदस्य डॉ. मंगेश गुलवाडे उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी गौडा म्हणाले, राज्यात मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना नुकतीच जाहीर झाली आहे. या योजनेंतर्गत शासनामार्फत शैक्षणिक अर्हता 12 वी पास करीता प्रतिमाह विद्यावेतन 6 हजार रुपये, आय.टी.आय/पदविका करीता प्रतिमहा 8 हजार रुपये तर पदवीधर/पदव्युत्तर करीता प्रतिमहा 10 हजार याप्रमाणे पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात दरमहा विद्यावेतन जमा करण्यात येईल. त्यामुळे या योजनेचा लाभ सर्वांपर्यंत पोहचवावा. तसेच जिल्हयातील सर्व उमेदवारांनी व आस्थापनांनी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी गौडा यांनी केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, शासन निर्णयाचे सादरीकरण सहायक आयुक्त भैय्याजी येरमे यांनी केले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

काय आहे योजना : जिल्हयातील युवक वर्ग आपले शिक्षण पुर्ण करून दरवर्षी मोठया संख्येने नोकरी, व्यवसाय यांच्या शोधात बाहेर पडत आहे. अशा बहुतांश युवकांना व्यवसाय व नोकरी संबंधित अनुभवाचा अभाव असल्याने व्यवसाय सुरू करणे अथवा नोकरी प्राप्त करण्यामध्ये अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे 12 वी पास, विविध ट्रेडमधील आय.टी.आय., पदविधारक, पदवी आणि पदव्युत्तर युवकांना शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देवून त्यांची नोकरी मिळण्याची क्षमता वाढविण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सन 2024-25 या आर्थिक वर्षापासून सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

येथे करा संपर्क : या करीता जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या http://www.mahaswayam.gov.in या वेब पोर्टलवर उमेदवारांनी व आस्थापनांनी नोंदणी करणे आवश्यक आहे. विना अनुभवी रोजगार इच्छुक पात्र उमेदवारांना आस्थापना/ उद्योग/महामंडळ यामध्ये प्रत्यक्ष कार्य प्रशिक्षण घेणे व कार्य प्रशिक्षणाचा कालावधी 6 महिने असेल. सदरच्या सहा महिन्याच्या कालावधीसाठी उमेदवारांना फक्त एकच वेळेस या योजनेचा लाभ घेता येईल. याबाबत अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, प्रशासकीय इमारत, पहिला माळा, चंद्रपूर येथे तसेच दूरध्वनी क्रमांक 07172- 252295 या क्रमांकावर संपर्क साधावा.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.