Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

शंकरबाबाच्या मानसकन्येचा विवाह गृहमंत्र्यांच्या घरी

Get real time updates directly on you device, subscribe now.

गृहमंत्री अनिल देशमुख करणार कन्यादान
20 डिसेंबरला जंगी विवाह सोहळा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

अचलपूर, 9 डिसेंबर : शंकरबाबा पापळकर यांच्या 24 व्या मानसकन्याचा शुभविवाह 20 डिसेंबरला राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरी नागपूरला होणार आहे. आश्रमातील वर्षा व समीर विवाहबद्ध होणार आहे.
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी 14 जानेवारीला वझ्झर येथील स्व. अंबादासपंत मतिमंद मूकबधिर बालगृहाला भेट दिली होती. त्यावेळी शंकरबाबा पापळकर यांनी कायद्यानुसार 18 वर्षानंतर पुनर्वसीत असलेल्या मुला-मुलींना अनाथालयात राहण्याची मुभा नाही. हे मुल स्वयंपूर्ण होईपर्यंत त्यांची अनाथालयात राहण्याची कायदयानुसार व्यवस्था करावी, अशी मागणी केली होती. तसेच बालगृहातील 18 वर्ष पूर्ण झालेल्या वर्षाच्या भविष्याची चिंता बाबांनी गृहमंत्र्यांकडे व्यक्त केली होती. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी त्याचवेळी वर्षाचा लग्न सोहळा व कन्यादान करण्याचे आश्वासन दिले होते. त्याच अनुषंगाने आश्रमातीलच अनाथ असलेल्या समीर याच्याशी वर्षाचा विवाह ठरविण्यात आला आहे.
वर्षा एक वर्षाची असताना नागपूरच्या रेल्वे टेशनवर बेवारस अवस्थेत पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी तिच्या आई वडीलांचा तपास केला परंतु, तिचे आई-वडील सापडले नाही. अखेर बाल कल्याण समितीच्या आदेशावरून वर्षाला शंकरबाबा पापळकर यांच्या सुपूर्द करण्यात आले होते. वर्षाचे शिक्षण संत गाडगेबाबा निवासी मूक बधीर विद्यालय परतवाडा येथे चौथीपर्यंत झाले आहे. तसेच समीर हा डोंबिवली, मुंबई येथील रेल्वे टेशनवर तीन वर्षाच्या वयाचा असताना पोलिसांना सापडला होता. त्यांच्या परिवाराचा शोध पोलिसांनी घेतला परंतु, त्याचे आई-वडील मिळाले नाही. बाल कल्याण समितीच्या आदेशावरून स्व. अंबादासपंत वैद्य बालगृहाकडे सुपूर्द करण्यात आले होते. बालगृहात वाढलेला समीर 27 वर्षाचा झाला आहे. बाबांनी या दोन्ही मानस पुत्र-पुत्रीचा आता विवाह होणार आहे.
या विवाहाची गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सर्व व्यवस्था केली असून आर्दश राष्ट्रीय लग्न सोहळ्याचे स्वरूप त्याला प्राप्त झाले आहे. 20 डिसेंबरला राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या निवासस्थानी नागपूरला विवाह होणार आहे. कन्यादान गृहमंत्री देशमुख करणार आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.