जाफ्राबाद येथील दोन विक्रेत्यांवर गुन्हा दाखल
-बामणी पोलिस व मुक्तिपथची संयुक्त कारवाई
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
गडचिरोली : जिल्ह्याच्या दक्षिण टोकावर वसलेल्या सिरोंचा तालुक्यातील जाफ्राबाद येथील दारू विक्रेत्यांकडून १६ ड्रम गुळाचा सळवा १५० लिटर मोहाची दारू असा एकूण १ लाख ८२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल नष्ट करीत दोन विक्रेत्यांवर गुन्हा दाखल केल्याची संयुक्त कारवाई बामणी पोलिस व मुक्तिपथ तालुका चमूने केली.
जाफ्राबाद येथील अवैध दारूविक्री विरोधात गाव संघटना व मुक्तिपथच्या माध्यमातून सातत्याने कृती केली जात आहे. त्यामुळेच मागील दोन महिन्यांपासून अवैध दारूविक्री पूर्णतः बंद झाली होती. परंतु, विधानसभा निवडणुकीच्या काळात गावातील जवळपास सहा दारूविक्रेत्यानी डोके वर काढत आपला अवैध व्यवसाय पुन्हा सुरु केला. याबाबतची माहिती गाव संघटनेच्या महिलांकडून प्राप्त होताच बामणी पोलिस व मुक्तिपथ तालुका चमूने दारूविक्रेत्यांच्या शेतशिवारात शोधमोहीम राबविली असता, १६ ड्रम गुळाचा सडवा, १५० लिटर मोहफुलाची दारू व साहित्य असा एकूण १ लाख ८२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल मिळून आला. याप्रकरणी दोन दारूविक्रेत्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांच्या या कारवाईमुळे गावातील इतर दारूविक्रेत्यांमध्ये खळबळ निर्माण झाली आहे. ही कारवाई बामणी पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी प्रमोद कुरसुंगे यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलिस अधिकारी अनिकेत बंडे आणि पोलिस कर्मचाऱ्यांनी केली. यावेळी मुक्तीपथ तालुका चमू उपस्थित होते.
Comments are closed.