गावाच्या एकीतून 5 वर्षांपासून मारोडा गाव दारूविक्रीबंद
लोकस्पर्श न्युज नेटवर्क,
गडचिरोली : गडचिरोली तालुक्यातील मारोडा गावाला दारूविक्री बंदी होऊन नुकतेच पाच वर्ष पूर्ण झाले आहे. मारोडा हे 900 लोकसंख्या असलेले गाव गडचिरोली वरून 16 किलोमिटर अंतरावर आहे. या गावात 2019 या वर्षात अवैध दारूविक्री सुरू झाली होती. मात्र तमुस समिती, ग्रामपंचायत, गाव संघटनेने एकत्र येत मुक्तिपथ तालुका चमुच्या मार्गदर्शनातून दारूबंदीला धक्का देणाऱ्या विक्रेत्यांना चांगलाच धडा शिकवला व अवैध दारूविक्री हद्दपार केली व आता मागील 5 वर्षांपासून हे गाव दारूबंदीसाठी प्रसिद्ध म्हणून नावारूपास आले आहे.
ग्रापं प्रशासन व गावसंघटन व पदाधिकारी यांच्या माध्यमातुन दारू विक्रेत्यांविरोधात कृती कार्यक्रम करून त्यांना वेगवेगळे दंड आकारून धडा वेळोवेळी शिकविण्यात आला आहे. मुजोर दारू विक्रेत्याविरोधात कायदेशीर कार्यवाही करण्यात आली. इत्यादि सतत केलेल्या प्रयत्नातून गाव दारू विक्री बंदी म्हणून टिकून आहे.
गावात दारू मिळत नसल्याने होणारे भांडणतंटे कमी झाले आहे, गावात होणारे मोठे कार्यक्रम शांततेत होत आहे. महिलांना दारूविक्री बंदीचा विशेष अभिमान व आनंद आहे. गावात पुन्हा दारू सुरू होऊ नये यासाठी दर महिन्याला संघटनेची बैठक गावात घेतल्या जाते. दारू पिणार्या व्यक्तिचे व्यसन सुटावे यासाठी मुक्तिपथ च्या माध्यमातून व्यसन उपचार शिबीर गावात घेण्यात आले आहे. दारूमुक्तीसाठी मॅरेथॉन, विजयस्तंभ, शाळा जाणीव जागृती कार्यक्रम घेऊन जागृती केली जात आहे. गावात कुणीही दारूविक्री करू नये, याकरिता 5 वर्षापासून गाव संघटन व तंटामुक्त समिती, ग्रामपंचायत समिती गावात पाळत ठेवत आहे
Comments are closed.