Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

आयुष्मान भारत योजनेतून मोफत उपचारांचे प्रमाण वाढवा – डॉ. ओमप्रकाश शेटे

अपघात विमा आणि टोल फ्री नंबरचा वापर करण्याचे आवाहन

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,

गडचिरोली: आयुष्मान भारत – प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेचा लाभ अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आरोग्य विभागाने पुढाकार घ्यावा, असे आवाहन आयुष्मान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे अध्यक्ष डॉ. ओमप्रकाश शेटे यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते.

या बैठकीत त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, कोणताही रुग्ण उपचारापासून वंचित राहता कामा नये, यासाठी कायदा व नियमापेक्षा माणसाचा जीव महत्त्वाचा समजून तातडीने उपचार व्हावेत. मोफत उपचार हा नागरिकांचा मूलभूत हक्क आहे. त्यामुळे लाभ देताना केवळ रुग्णाचे आयुष्मान कार्ड किंवा रेशन कार्ड तपासावे, नातेवाईकांचे कार्ड मागून लाभ नाकारणे टाळावे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

अपघातग्रस्त रुग्णांसाठी ‘स्व. बाळासाहेब ठाकरे अपघात विमा योजना’ उपयुक्त ठरू शकते. यासाठी टोल फ्री क्रमांक 18002332200 वापरण्याचे निर्देश त्यांनी दिले. राज्यात सध्या मोफत उपचाराचे प्रमाण 30 टक्के आहे. हे प्रमाण किमान 85 टक्क्यांपर्यंत वाढवण्याचा सरकारचा मानस असून, यासाठी आरोग्य यंत्रणेला नव्या दमाने कार्याला लागावे लागेल, असे ते म्हणाले.

बैठकीला आमदार डॉ. मिलींद नरोटे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, निवासी उपजिल्हाधिकारी सुनील सुर्यवंशी, जिल्हा पुरवठा अधिकारी प्रकाश पाटील, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. माधुरी किलनाके, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रताप शिंदे यांच्यासह शासकीय व खाजगी रुग्णालयांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

बैठकीत गडचिरोली जिल्ह्यातील योजनेची सद्यस्थिती सादरीकरणाद्वारे मांडण्यात आली. जुलै 2024 पासून आतापर्यंत ८८३ लाभार्थ्यांकडून ९०२ प्रस्ताव प्राप्त झाले असून, त्यापैकी ८०० प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली आहे. त्यासाठी एकूण १ कोटी ७७ लाख ३६ हजार ७०० रुपयांची रक्कम मंजूर करण्यात आली आहे.

जिल्ह्यात आत्तापर्यंत ४ लाख ४४ हजार २९० आयुष्मान कार्डे तयार करण्यात आली असून, हे ४८ टक्के प्रमाण असल्याचे डॉ. शिंदे यांनी सांगितले. हे प्रमाण वाढवून 100 टक्क्यांपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट त्यांनी मांडले. बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना डॉ. शेटे यांनी जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी माध्यमांनी सहकार्य करावे, असे आवाहन केले. या बैठकीत खाजगी रुग्णालयांच्या प्रतिनिधींनीही अंमलबजावणीत येणाऱ्या अडचणी, त्रुटी आणि शंका मांडल्या, त्यावर उपाययोजना करण्यात येतील, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.