Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गडचिरोलीत निवृत्त महिला अधिकाऱ्याच्या निर्घृण खुनातील आरोपीला पोलिसांची शिताफीने अटक

तांत्रिक पुराव्यांच्या आधारे गुन्हा उघडकीस

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

गडचिरोली: नवेगाव येथे राहणाऱ्या निवृत्त महिला अधिकारी कल्पना केशव उंदिरवाडे (वय 64) यांचा त्यांच्या राहत्या घरी निर्घृण खून करण्यात आला होता. या प्रकरणातील आरोपीला गडचिरोली पोलिसांनी तांत्रिक पुरावे आणि गोपनीय माहितीच्या आधारे अत्यंत कौशल्याने शोधून काढले असून, त्यास अटक करण्यात आली आहे.

ही घटना 13 एप्रिल 2025 रोजी दुपारी 12:00 ते 2:30 च्या दरम्यान घडली होती. आरोपीने महिलेच्या डोक्यावर प्राणघातक हल्ला करून तिचा जागीच मृत्यू घडवून आणला होता.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

पोलीसांसमोर मोठे आव्हान: कोणताही थेट पुरावा नव्हता

या हत्येनंतर मयत महिलेचे भाऊ, पोलीस उपनिरीक्षक मोहन सोनकुसरे यांनी गडचिरोली पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात आरोपीविरुद्ध फिर्याद दिली होती. त्यावरून अप. क्र. 0231/2025, कलम 103 भा.दं.वि. अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला. तपास अधिक गुंतागुंतीचा होता कारण आरोपीने कोणताही स्पष्ट पुरावा मागे सोडलेला नव्हता.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

तीन पथकांची प्रभावी कामगिरी; आरोपी विशाल वाळके अटकेत.

तपास पथकांनी घटनास्थळाचे बारकाईने परीक्षण करून शेजारील साक्षीदार व तांत्रिक पुरावे गोळा केले. यातून संशयित आरोपी विशाल ईश्वर वाळके (वय अंदाजे 40), रा. एटापल्ली, सध्या राहणार कल्पना विहार, नवेगाव, यास ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान त्याने गुन्हा केल्याचे कबूल केले आणि त्याला आज, 18 एप्रिल 2025 रोजी अटक करण्यात आली.

भाडेकरूच निघाला खुनी; आर्थिक अडचणींमुळे केली हत्या

आरोपी विशाल वाळके हा मृत महिलेच्या घरात भाडेकरू म्हणून राहत होता. त्याच्यावर असलेल्या कर्जामुळे आणि आर्थिक तंगीमुळे चोरी करण्याच्या उद्देशाने त्याने महिलेच्या घरात शिरून, त्यांच्या डोक्यावर घातक हत्याराने वार केला. त्यानंतर त्याने घरातील सोन्याचे दागिने लुटून पळ काढला.

तांत्रिक तपासातून कठीण गुन्हा उघडकीस

सदर गुन्ह्यात कुठलाही थेट पुरावा नसताना, पोलिसांनी केवळ तांत्रिक विश्लेषण, मोबाईल लोकेशन ट्रॅकिंग आणि गुप्त माहितीच्या आधारे आरोपीचा शोध घेऊन गुन्हा उघडकीस आणला. आरोपीला प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, गडचिरोली यांच्या समोर हजर केले असता 18 ते 22 एप्रिल 2025 पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली.

पोलिसांचे कौतुकास्पद कामगिरी

ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक यतिश देशमुख व उपविभागीय पोलीस अधिकारी सुरज जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. तपासात पुढील अधिकारी व कर्मचारी सक्रिय सहभागी होते.पोलीस निरीक्षक रेवचंद सिंगनजूडे, पो. उप. नि. विजय चव्हाण,उप. नि. विशाखा म्हेत्रे,अंमलदार पथक गडचिरोली पोलीस दलाच्या या धाडसी आणि शिस्तबद्ध कारवाईमुळे परिसरात पोलिसांविषयी विश्वास अधिक दृढ झाला आहे. आरोपीविरोधात कडक कारवाई होणार असून, पुढील तपास वेगाने सुरू आहे.

 

Comments are closed.