Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

राष्ट्रीय लोकअदालत 10 मे रोजी; गडचिरोली जिल्ह्यातील न्यायालयांमध्ये होणार आयोजन

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली, दि. 21 : महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या सूचनेनुसार आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश मा. विनायक रा. जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली, गडचिरोली जिल्ह्यात दिनांक 10 मे 2025, शनिवारी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात येत आहे. ही लोकअदालत जिल्हा व सत्र न्यायालय गडचिरोली व अहेरी, तसेच आरमोरी, चामोर्शी, देसाईगंज, धानोरा, कुरखेडा आणि सिरोंचा येथील तालुका न्यायालयांमध्ये एकाच दिवशी पार पडणार आहे.

राष्ट्रीय लोकअदालतीचा उद्देश न्यायप्रक्रियेतील विलंब टाळून दोन्ही पक्षकारांच्या सहमतीने तडजोडीच्या माध्यमातून प्रलंबित प्रकरणांचे जलद निराकरण करणे हा आहे. या दिवशी गेल्या 40 वर्षांपासून प्रलंबित असलेली तडजोडीस पात्र फौजदारी व दिवाणी प्रकरणे, तसेच दाखलपूर्व (Pre-litigation) प्रकरणे देखील लोकअदालतीच्या माध्यमातून निकाली काढली जाणार आहेत.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

लोकअदालतीत घेतले जाणारे प्रकरण..

फौजदारी व दिवाणी दावे, कलम 138 नॅशनल इन्स्ट्रुमेंट्स अॅक्टखालील धनादेश वठवण्यासंदर्भातील प्रकरणे, भूसंपादन व मालमत्तेसंबंधी दावे,कौटुंबिक वाद (घटस्फोट, भरणपोषण, मुलांचा ताबा इ.), मोटार वाहन अपघात विमा दावे, बँकांकडील थकीत कर्ज वसुली प्रकरणे, मोबाईल, टेलिफोन सेवा, वीज वितरण मंडळाशी संबंधित वाद, स्थानिक स्वराज्य संस्थांशी (नगर परिषद, ग्रामपंचायत) संबंधित कर वसुली प्रकरणे. या लोकअदालतीमध्ये तडजोडीद्वारे निर्णय होणाऱ्या प्रकरणांत पक्षकारांचा वेळ, श्रम व आर्थिक खर्च वाचतो, तसेच न्यायालयीन प्रक्रिया सुलभ होते. यामुळे पक्षकारांमध्ये वादाऐवजी संवाद आणि समजूतदारपणा वाढतो, जो सामाजिक सलोखा आणि शांततेसाठी महत्त्वपूर्ण आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

लोकअदालतीमध्ये पारित केले जाणारे निर्णय (Award) हे न्यायालयीन आदेशाइतकेच बंधनकारक असतात आणि त्याची अंमलबजावणी देखील तत्काळ केली जाते. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव आर. आर. पाटील, तसेच सर्व सदस्यांनी पक्षकार, अधिवक्ते आणि सर्वसामान्य नागरिकांना आवाहन केले आहे की, त्यांनी या लोकअदालतीत सक्रिय सहभाग घ्यावा व आपल्या प्रलंबित प्रकरणांचा तडजोडीच्या माध्यमातून निकाल लावून घ्यावा.यासाठी आवश्यक त्या सर्व सेवा व सुविधा प्राधिकरणामार्फत मोफत पुरविण्यात येणार आहेत.अधिक माहितीसाठी किंवा आपल्या प्रकरणांचा विचार होण्यासाठी इच्छुकांनी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, गडचिरोली कार्यालयाशी संपर्क साधावा.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.