पद मिळवायचंय? मग दलालांच्या भूलथापांना बळी पडू नका!
जिल्हा परिषदेची पदभरती प्रक्रिया पारदर्शक; मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे स्पष्ट इशारा..
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली :“जिल्हा परिषदेअंतर्गत पदभरती प्रक्रिया ही संपूर्णतः प्रामाणिक व पारदर्शक असून, उमेदवारांनी कोणत्याही खाजगी दलाल, एजंट किंवा खोट्या आश्वासनांना बळी पडू नये,” असा स्पष्ट इशारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांनी दिला आहे.
गट-क आणि गट-ड या संवर्गातील रिक्त पदे सरळसेवा, पदोन्नती व अंतर्गत बदलीद्वारे भरण्यात येतात. त्याचप्रमाणे, अनुकंपा तत्वावरही नियमानुसार नियुक्त्या दिल्या जातात. यासाठी प्रतीक्षा यादीत असलेल्या उमेदवारांना आवश्यक कागदपत्रांसह पडताळणीसाठी बोलावण्यात येते. शैक्षणिक पात्रता, ज्येष्ठता व उपलब्ध जागा यानुसार समुपदेशनाद्वारे निवड प्रक्रिया पार पाडली जाते.
गाडे यांनी स्पष्ट केलं की, “भरतीसंदर्भातील कोणताही शॉर्टकट अथवा अनधिकृत मार्ग हा उमेदवारांना फसवणुकीच्या गर्तेत नेऊ शकतो. त्यामुळे कोणी पद मिळवून देतो म्हणून पैसे मागत असेल तर तात्काळ प्रशासनाला कळवावे.”
फसवणुकीचे जाळे टाळा, पात्रतेवर विश्वास ठेवा..
राज्यात आणि जिल्ह्यात अलीकडे नोकरीच्या नावाखाली फसवणुकीचे प्रकार वाढत असल्याने, गडचिरोलीसारख्या भागातही अशा प्रवृत्ती सक्रिय होण्याची शक्यता प्रशासनाने लक्षात घेतली आहे. “आपण पात्र असाल तर नियमानुसार नोकरी नक्की मिळते, मात्र दलालांच्या मार्गाने गेल्यास फक्त पैसे वाया जातात आणि भविष्य अंधारात जातं,” असे प्रशासनाने अधोरेखित केले.
भरती संदर्भात अधिकृत माहितीसाठी कुठे संपर्क साधावा?..
उमेदवारांनी भरती प्रक्रियेबाबत अधिकृत माहिती मिळवण्यासाठी जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर किंवा संबंधित अधिकाऱ्यांशी कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.
Comments are closed.