Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

धान खरेदीसाठी मुदतवाढ; शेतकऱ्यांना ३१ मेपर्यंत दिलासा

सिरोंचा तालुक्यातील ९ केंद्रांवर खरेदी सुरूच राहणार; ऑनलाईन नोंदणी अनिवार्य.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

गडचिरोली, दि. २१: खरीप हंगाम २०२४-२५ करिता सुरू असलेल्या धान खरेदीसाठी शेतकऱ्यांना आणखी थोडा दिलासा मिळाला आहे. आदिवासी भागातील शेतकऱ्यांच्या सोयीचा विचार करून अहेरी उपविभागातील धान खरेदी केंद्रांवरील खरेदीसाठीची अंतिम मुदत ३१ मे २०२५ पर्यंत वाढविण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ मर्यादित, नाशिक (उच्च श्रेणी) आणि उप प्रादेशिक कार्यालय, अहेरी (उच्च श्रेणी) यांच्या माध्यमातून ही सुविधा पुरविण्यात येत आहे.

सिरोंचा तालुक्यातील सिरोंचा, आसरअल्ली, अमरादी, अंकीसा, वडधम, जाफ्राबाद, बामणी, पेटिपाका आणि विठ्ठलरावपेठा या नऊ खरेदी केंद्रांवर ही मुदतवाढ लागू राहणार आहे. या केंद्रांवरील टिडीसी, एपीएमसी, ग्रामपंचायत, वनविभाग, कृषी विभाग तसेच शासकीय आश्रमशाळेतील गोदामांमध्ये सध्या खरेदीची प्रक्रिया सुरू आहे. शेतकऱ्यांना आपला माल या ठिकाणी विक्रीस आणण्याची मुभा असून शासनाच्या आधारभूत किंमतीनुसार पैसे दिले जात आहेत.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

नोंदणीशिवाय खरेदी नाही!

शेतकऱ्यांनी धान विक्रीपूर्वी ऑनलाईन नोंदणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. नोंदणी करताना ई-पिक पत्रक (सातबारा, नमुना ८ अ), आधारकार्ड, बँक पासबुक, ई-केवायसी तसेच संमतीपत्र ही आवश्यक कागदपत्रे सादर करावी लागतील. केवळ पात्र आणि नोंदणीकृत शेतकऱ्यांनाच खरेदी केंद्रांवर प्रवेश दिला जाणार आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

महामंडळाचं आवाहन

शासनाच्या खरेदी योजनेचा लाभ वेळेत घ्यावा आणि आपला धान योग्य दरात विकावा, असे आवाहन आदिवासी विकास महामंडळ, अहेरीचे उप प्रादेशिक व्यवस्थापक बी. एस. बरकमकर यांनी शेतकऱ्यांना केले आहे. शासनामार्फत दिल्या जाणाऱ्या आधारभूत दराचा फायदा घेत शेतकऱ्यांनी आर्थिक स्थैर्य प्राप्त करावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

शेतकऱ्यांची प्रतिक्रिया

मुदतवाढीमुळे काही कारणास्तव आपला धान अद्याप विक्रीस आणू न शकलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. “पावसामुळे सुकवणीत उशीर झाला, आता तरी धान खरेदी होईल याची आशा आहे,” अशी भावना अमरादी गावातील शेतकरी पोचैया मडावी यांनी व्यक्त केली.

 

Comments are closed.