Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

भामरागडच्या जंगलात 36 तासांची निर्णायक लढाई ; दलम कमांडरसह चार कडव्या माओवाद्याचा खात्मा..

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

गडचिरोली 23 मे : छत्तीसगड सीमेलगतच्या भामरागडच्या दाट जंगलांमध्ये पोलिस व सीआरपीएफच्या संयुक्त अभियानाने माओवादी चळवळीवर मोठा घाव घातला आहे. नुकत्याच स्थापन झालेल्या कवंडे पोलिस स्टेशनच्या हद्दीत, 36 तासांपर्यंत चाललेल्या खडतर चकमकीत दलम कमांडरसह चार कडव्या माओवादी कार्यकर्त्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे.

या माओवादी नेत्यांवर एकत्रित १४ लाखांचे बक्षीस जाहीर होते. त्यांच्या ताब्यातून चार घातक शस्त्रे, वॉकीटॉकी, आणि माओवादी साहित्य हस्तगत करण्यात आले आहे. या कारवाईमुळे भामरागड-इंद्रावती पट्ट्यातील माओवादी हालचालींना मोठा धक्का बसला आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

गुप्त माहितीवरून पोलिसांची तातडीची कारवाई…

22 मे रोजी गुप्तचर यंत्रणांकडून मिळालेल्या विश्वसनीय माहितीनंतर गडचिरोली पोलिसांच्या सी-60 कमांडोच्या 12 तुकड्या आणि सीआरपीएफ 113 बटालियनच्या डी कंपनीची तुकडी इंद्रावती नदीच्या काठावरील कवंडे-नेलगुंडा परिसरात रवाना झाली. सकाळी 7 वाजता जंगलात घेराबंदी करत असताना माओवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार सुरु केला.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

पोलिसांनी शरण येण्याचे आवाहन केल्यानंतरही माओवाद्यांनी जोरदार प्रतिहल्ला चढवला. प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी केलेल्या गोळीबारात दोन महिला व दोन पुरुष अशा चार माओवादी ठार झाले. चकमक दोन तास चालली. उर्वरित माओवादी जंगलाचा फायदा घेत पळून गेले.

ठार झालेल्या माओवादींची माहिती ..

1. सन्नु मासा पुंगाटी (वय 35) – भामरागड दलम कमांडर, 8 लाखांचे बक्षीस, खून व चकमकीचे 3 गुन्हे.

2. अशोक ऊर्फ सुरेश वड्डे (वय 38) – 17 गंभीर गुन्हे, 5 खून, 6 चकमकी, 2 लाखांचे बक्षीस.

3. विज्यो होयामी (वय 25) – छत्तीसगडच्या गंगालूर भागातील सक्रिय माओवादी, 12 गुन्हे.

4. करुणा ऊर्फ ममीता वरसे (वय 21) – भामरागड दलम सदस्य, 9 गुन्हे, 2 लाखांचे बक्षीस.

त्यांच्याकडून एक एसएलआर, दोन .303 रायफल्स, एक भरमार बंदूक, वॉकीटॉकी आणि माओवादी प्रचार साहित्य जप्त करण्यात आले आहे.

संघर्षातून शांततेकडे – बदलत्या गडचिरोलीचं चित्र…

गेल्या चार वर्षांत गडचिरोली पोलिसांनी 87 माओवादी कार्यकर्त्यांचा खात्मा केला आहे, तर 124 जणांना अटक व 63 माओवादींनी आत्मसमर्पण केले आहे. या सातत्यपूर्ण मोहिमांमुळे माओवादी गटांमध्ये गोंधळ, अस्वस्थता आणि निष्क्रियता दिसून येत आहे.

पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी या अभियानाची प्रशंसा करताना जवानांच्या धाडसाचे अभिनंदन केले. त्यांनी सूचित केले की, “संपूर्ण भामरागड उपविभागात माओवादविरोधी मोहीम आणखी तीव्र करण्यात येईल. माओवाद्यांनी आता हत्यार खाली ठेवून शांततेचा मार्ग स्वीकारावा, हेच आमचं आवाहन आहे.”

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.