सायकल चालवा, आरोग्य जपा – पर्यावरण वाचवा!…
गडचिरोली पोलीस दलाच्या सायकल रॅलीत नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
गडचिरोली | ४ जून २०२५: जागतिक सायकल दिनानिमित्त गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने आज शहरात सायकल रॅलीचे भव्य आयोजन करण्यात आले. “स्वच्छ पर्यावरण, निरोगी जीवन” या संकल्पनेवर आधारित या रॅलीत शासकीय यंत्रणा आणि नागरिक यांचा समन्वय दिसून आला.
या रॅलीचा शुभारंभ पोलीस कवायत मैदान, गडचिरोली येथून सकाळी ७ वाजता झाला. इंदिरा गांधी चौकापर्यंतच्या मार्गावरून जात, रॅलीचा समारोप शहीद पांडु आलाम सभागृहात झाला.
या उपक्रमात पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन/अभियान) एम. रमेश, पोलीस उप-अधीक्षक विशाल नागरगोजे यांच्यासह ३०० हून अधिक पोलीस अधिकारी, कर्मचारी, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, युवक-युवतींनी सक्रिय सहभाग नोंदवला.
कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले, “सायकल ही केवळ वाहतुकीचं साधन नसून आरोग्यदायी जीवनशैलीकडे जाणारा एक मार्ग आहे. सायकल चालविल्यामुळे शरीर सशक्त राहते आणि पर्यावरणावरही सकारात्मक परिणाम होतो. आठवड्यातून दोन दिवस किमान एक तास सायकल चालवल्यास आरोग्य टिकवणं सहज शक्य आहे.”
रॅलीतील सहभागी प्रत्येक सायकलस्वाराला पोलीस दलाच्यावतीने प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. त्यानंतर सहभागींसाठी अल्पोपहाराचे आयोजन करण्यात आले.
या उपक्रमासाठी नागरी कृती शाखेचे पो.उ.नि. चंद्रकांत शेळके आणि विविध शाखांचे अधिकारी व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
जागतिक सायकल दिनाच्या निमित्ताने गडचिरोली पोलीस दलाने आरोग्य आणि पर्यावरणाबाबत समाजात जनजागृती करत एक सकारात्मक पाऊल उचलल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.
Comments are closed.