गडचिरोलीत पंचायत समितीतील लिपिकाची आत्महत्या; मानसिक तणावातून टोकाचे पाऊल उचलल्याची शक्यता?
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, १३ जून : जिल्हा परिषदेच्या गडचिरोली पंचायत समितीच्या आस्थापना विभागात कार्यरत असलेल्या लिपिकाने गुरुवारी रात्री आपल्या राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. अशोक चंद्रशहा हलामी (५२), रा. धानोरा, सध्या मुक्काम रामनगर, गडचिरोली असे आत्महत्या केलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, ही घटना गुरुवारी रात्री सुमारे ८.३० वाजताच्या सुमारास रामनगर परिसरात घडली. हलामी हे गडचिरोली पंचायत समितीच्या आस्थापना शाखेत लिपिक पदावर कार्यरत होते. ते पत्नीसमवेतच राहत होते. दांपत्याला मूलबाळ नव्हते, आणि याच कारणामुळे ते गेल्या काही काळापासून मानसिक तणावात असल्याचे त्यांच्या नातेवाइकांकडून सांगण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच गडचिरोली पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत लटकलेला मृतदेह खाली उतरवून उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविला आहे .पोलिसांच्या प्राथमिक अंदाजानुसार, दीर्घकाळ मूल न होण्याच्या मानसिक यातनेतून त्यांनी आत्महत्यासारखे टोकाचे पाऊल उचलले असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. याबाबत अधिक तपास गडचिरोली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
या दुर्दैवी घटनेमुळे सहकारी कर्मचाऱ्यांमध्ये आणि रामनगर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. सततच्या तणावात राहणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांसाठी समुपदेशन व मानसिक आरोग्यविषयक उपाययोजनांची गरज अधोरेखित होत असून, अशा घटना टाळण्यासाठी प्रशासनाने संवेदनशील दृष्टिकोनातून लक्ष घालण्याची गरज असल्याचे मत विविध स्तरांतून व्यक्त होत आहे.
Comments are closed.