भुरट्या चोरट्यांचा पर्दाफाश; पोलिसांच्या ‘चौकस’ तपासाचे यश
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, २६ जून : शहरात सलग काही दिवस व्यापारी दुकाने फोडून दहशत माजवणाऱ्या भुरट्या चोरट्यांच्या टोळीला अखेर पोलिसांनी शिताफीने अटकाव घातला आहे. विशेष म्हणजे, ही टोळी अल्पवयीन बालकांची असून, फाटक्या कपड्यांत फिरणाऱ्या या ‘गल्लोगल्लीतल्या’ चोरट्यांनी चक्क व्यापारी शटर फोडून हजारो रुपयांचे साहित्य लांबवले होते. पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या सुक्ष्म सूचना आणि डिटेक्शन पथकाच्या कसोशीच्या तपासामुळे हा प्रकार उघडकीस आला.
गडचिरोली पोलीस ठाण्यात १९ जून रोजी दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याच्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली – शहराच्या चामोर्शी रोड, धानोरा रोड आणि चंद्रपूर रोडवर सलग तीन ते चार दुकाने रात्रीच्या वेळी फोडली जात होती. सुरुवातीला ही घटनासाखळी किरकोळ वाटली, मात्र पोलिसांनी वेळीच दक्षता घेत सीसीटीव्ही फुटेज बारकाईने तपासले आणि संशयाच्या धागेदोऱ्यांनी एकेक दुवा जोडत आरोपींपर्यंत पोहोचले.
चार अल्पवयीन चोरटे ताब्यात, मुद्देमाल हस्तगत..
या प्रकरणात चार अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्या ताब्यातून चोरीस गेलेला काही मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून, पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी त्यांना बाल न्याय मंडळासमोर हजर करण्यात येणार आहे. बाल कल्याण पोलिस अधिकारी व स्थानिक पोलिसांच्या संयुक्त कारवाईमुळे हा गुन्हा उकलण्यात यश आले.
पोलिसी कार्यक्षमता आणि सामाजिक भान यांचे उत्तम उदाहरण..
या कारवाईमध्ये पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक सत्य साई कार्तिक, आणि उपविभागीय अधिकारी सुरज जगताप यांचे सखोल मार्गदर्शन लाभले. पोनि. विनोद चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली डिटेक्शन पथकातील पो.अं. धनंजय चौधरी, स्वप्निल कुडावले, स्वदिप मेश्राम, तुषार खोब्रागडे आणि अतुल भैसारे यांनी विशेष मेहनत घेतली.
ही केवळ गुन्हे उकलण्याची बाब नसून, समाजात वाढत असलेल्या अल्पवयीन गुन्हेगारीविषयीचा विचार करायला लावणारा प्रकार आहे. आर्थिक दुर्बलतेचा, शिक्षणाच्या अभावाचा आणि शहरातल्या वंचित वास्तवाचा परिणाम म्हणून हे अल्पवयीन मुले गुन्हेगारीच्या वाटेवर वळली.
भुरट्या चोरीपासून माफियापर्यंत – पोलिसांची सजग नजर..
गडचिरोली पोलीस दलाने शहरात घडणाऱ्या किरकोळ वाटणाऱ्या घटनांनाही गांभीर्याने घेतले आहे. अशा टोळ्यांच्या मुसक्या आवळण्याबरोबरच सामाजिक पुनर्वसनाच्या दिशा लक्षात घेऊन पोलिसांनी अल्पवयीन आरोपींवर तातडीने बालन्याय प्रक्रियेनुसार कार्यवाही सुरू केली आहे. ही घटना पोलिसांच्या कार्यक्षमतेचा दाखला तर देतेच, पण त्याहीपेक्षा अधिक ती एक प्रश्न उभी करते.
भविष्यातील गुन्हेगार आम्ही घडवतोय का?..
ही केवळ चोरी नव्हे – ही समाजातील पोकळीची झलक आहे. पोलिसांची ही कारवाई योग्यवेळी हस्तक्षेप करणारी असली, तरी यातून पुढच्या टप्प्यावर शिक्षण, पुनर्वसन व समुपदेशनाचे पायाभूत प्रश्न उपस्थित होतात.
Comments are closed.