अहेरीतील मॉडेल स्कूलचा शिक्षक प्रश्न विधानसभेत — आ. डॉ.धर्मराव बाबा आत्राम यांची सभागृहात ठाम भूमिका, दर्जेदार शिक्षणासाठी आवाज बुलंद
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई, दि. १९ जुलै : गडचिरोली जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रासमोरील गंभीर समस्यांपैकी एक असलेला अहेरी येथील पीएम श्री मॉडेल स्कूलमधील शिक्षकांच्या कमतरतेचा मुद्दा अखेर थेट महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात पोहोचला आहे. शुक्रवारी आ. डॉ. धर्मरावबाबा आत्राम यांनी या प्रश्नावर औचित्याचा मुद्दा मांडत सभागृहाचे लक्ष वेधले आणि शासनाच्या दुर्लक्षावर ठाम सवाल उपस्थित केला.
या मुद्द्याला पार्श्वभूमी आहे गुरुवारी घडलेल्या एका असामान्य आंदोलनाची — जेव्हा अहेरीच्या पीएम श्री मॉडेल स्कूलचे विद्यार्थी थेट पंचायत समिती गाठत, शिक्षकांच्या भरतीसाठी मोर्चेबांध स्वरूपात आवाज उठवू लागले. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर संवर्ग विकास अधिकारी गणेश चव्हाण यांनी तात्पुरत्या स्वरूपात शिक्षकांची नियुक्ती केली जाईल, असे आश्वासन दिले. मात्र ही तात्पुरती सवलत असून कायमस्वरूपी शिक्षक भरतीचा प्रश्न तसाच प्रलंबित आहे.
आ. डॉ. धर्मराव आत्राम यांनी सभागृहात हे स्पष्टपणे मांडले की, गडचिरोली जिल्हा परिषद अंतर्गत चालणाऱ्या या मॉडेल स्कूलमध्ये सध्या फक्त तीनच शिक्षक कार्यरत असून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य अंधारात जात आहे. शासकीय पातळीवर ‘पीएम श्री स्कूल’ सारख्या मॉडेल संकल्पना मांडल्या जात असताना प्रत्यक्षात या संस्थांमध्ये मूलभूत शिक्षक भरतीच नसेल, तर ‘गुणवत्तापूर्ण शिक्षण’ केवळ घोषणाबाजी ठरेल, असा इशारा त्यांनी दिला.
विशेष म्हणजे, या शाळेतील विद्यार्थी केवळ शिक्षकांची नियुक्ती व्हावी यासाठी लोकशाही मार्गाने आंदोलन करत असल्याची बाब आ.आत्राम यांनी सभागृहात अधोरेखित केली. त्यांनी प्रश्न उपस्थित करताना हेही स्पष्ट केले की, राज्य सरकारने या शाळांमध्ये दर्जेदार शिक्षकांची भरती करून त्यांच्या गुणवत्तेची हमी घ्यावी, अन्यथा ‘मॉडेल’च्या नावाखाली विद्यार्थ्यांचा विश्वासघात होईल.
या मुद्द्यावरून आता शिक्षण विभाग, जिल्हा प्रशासन आणि शासन यांच्याकडून सकारात्मक पावले उचलली जातील, अशी अपेक्षा व्यक्त होत असून अहेरीच्या विद्यार्थ्यांचा आवाज आता राजधानीतील राजकारणातही पोहोचल्याने लवकरच निर्णायक निर्णय होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
Comments are closed.