बंदुकीवर संविधानाचा विजय : गडचिरोलीत सुरक्षा, पुनर्वसन आणि सहभागाचं त्रिसूत्र
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
ओमप्रकाश चुनारकर,
गडचिरोली – नाव घेताच डोळ्यांसमोर उभी राहते ती दहशतीच्या सावल्यांनी झाकोळलेली माती. नकाशावरचा मागास जिल्हा, पण इतिहासात लाल रंगात रंगवलेला प्रदेश. बंदुकीच्या धमक्यांनी दरवळणारी दऱ्याखोरी, शिकण्याऐवजी शस्त्र हातात घ्यावी लागणारी मुलं, आणि ‘संविधान’ या संकल्पनेचाच अभाव. कधीकाळी इथं ‘जन न्यायालय’ नावाच्या बंद खोल्यांमध्ये लोकशाहीच्या नावानं अराजक माजायचं. पण आता, त्याच जंगलातून आशेचा सूर्य उगम पावतो आहे – आणि तो सूर्य वर्दीतील आहे.
गेल्या काही वर्षांत गडचिरोलीत ज्या प्रमाणात बदल घडले, ते फक्त आकडे किंवा यशगाथा नाहीत. ही परिवर्तनाची गाथा आहे – एका संपूर्ण जिल्ह्याच्या मनोविश्वात खोलवर उतरलेल्या जखमा भरून नवा श्वास देण्याची. या संक्रमणाच्या केंद्रस्थानी आहे गडचिरोली पोलीस दल – विशेषतः त्याचे नेतृत्व करणारे पोलीस अधीक्षक निलोत्पल. त्यांचं नेतृत्व केवळ पोलिसी डावपेचांचं नाही, तर मानवी समजुतीच्या पातळीवर उतरून “हिंसा का होते?” या प्रश्नाचा धांडोळा घेणारं आहे. त्यांनी जंगलात ‘दहशतवादी’ शोधले नाहीत, तर हरवलेली माणसं शोधली.

‘ऑपरेशन रोशनी’, ‘प्रयास’, ‘संजीवनी’, ‘उडान’ हे केवळ सरकारी उपक्रम नव्हते, तर त्या आहेत गडचिरोलीच्या आयुष्यात उमललेली स्वप्नं. ‘पोलीस दादालोरा खिडकी’, ‘महाजनजागरण मेळावे’, ‘गडचिरोली मॅरेथॉन’ हे नागरी संवादाचे सोपान आहेत, जिथे एकेकाळी संवादाचीच भीती वाटायची. रस्त्यांच्या वळणांवर आता टप्प्याटप्प्याने सुरक्षेच्या बरोबरच संधींचीही चाहूल लागते आहे. आज बंदुकीऐवजी मोबाईल टॉवर उभे राहतात, पुलांवरून पुस्तकं वाहतात आणि शाळेच्या पटांगणात ‘सर, आम्हालाही शिकायचं आहे’ अशी आर्त हाक उमटते.
या बदलाचे केंद्र गडचिरोली पोलीस दलाचं अमोघ शौर्य आणि माणुसकीच्या भावनेने भारलेली यंत्रणा आहे. गेल्या तीन वर्षांत १७ चकमकी, ३६ माओवादी ठार, ६९ अटकेत, आणि ५९ जणांचे आत्मसमर्पण हे आकडे नसून एका यंत्रणेनं हिंसाचाराच्या चक्राला रोखून समाजमनात संविधानाची पालवी कशी रुजवली, याचा पुरावा आहे. फक्त दहशतीवर विजय नाही, तर हिंसेमागील ‘कारणां’वर मात करणं – हाच गडचिरोलीच्या यशाचा खरा मंत्र आहे.
गावकऱ्यांच्या तोंडात आता नव्या भाषा आहेत – बँक खातं, प्रशिक्षण, रोजगार, पोलीस मामा, स्कॉलरशिप – आणि या सगळ्याच्या मुळाशी आहे, जिल्ह्याच्या गाभ्यापर्यंत पोहोचलेली शासनाची संवेदनशील पावलं. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या समोरच आत्मसमर्पित माओवादी युवकांचे विवाह, पुनर्वसन, मुलांसाठी नवी घरं, नवा शिक्षणप्रवास – हे सगळं समाजमनाचं नवं संकल्पनाचित्र आहे. गडचिरोली पोलिसांनी केवळ गुन्हेगारांना पकडलं नाही, तर भविष्यासाठी त्यांच्यातली माणुसकी उभी केली.
या सर्व कामगिरीला राजकीय पाठबळ मिळालं – आणि ते होतं मुख्यमंत्री आणि पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं. गडचिरोलीसाठी ते एक प्रकल्प किंवा जिल्हा म्हणून नाही, तर जबाबदारी म्हणून उभे राहिले. सुरजागड लोहखनिज प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याचं तसेच ८५ किलोमीटर स्लरी पाईपलाईनचे भूमिपूजन त्यांच्याच हस्ते होत आहे – आणि तेही त्यांच्या २२ जुलै वाढदिवसाच्या दिवशी. हा निव्वळ योगायोग नाही, तर ‘वाढदिवस साजरा करायचा असेल, तर कोणाच्या जीवनात उजेड द्यावा’ या विचारांची साक्ष आहे.
आज गडचिरोलीमध्ये २० हजारांहून अधिक युवकांना रोजगार, ८०० हून अधिक गावांना रस्ते, आणि दर्जेदार पोलीस ठाणी, आरोग्य सेवा, शिक्षणाच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. ही यशोगाथा आहे, जी एका प्रशासकीय ध्येयवादी नेतृत्वाने, संवेदनशील पोलीस अधिकाऱ्यांनी, आणि सामाजिक समरसतेच्या बळावर उभी केली आहे.
गडचिरोलीच्या जंगलात आता बंदुकीचा आवाज नाही, तर पुस्तकांची चुरचुर, शाळेची घंटा, आणि मतदान यंत्रावर बोट ठेवणाऱ्या हातांचा नवा आत्मविश्वास ऐकू येतो आहे. हे यश कुणा एकट्याचं नाही, ही विजयगाथा आहे – हिरव्या वर्दीतील हिरकणी, संविधानावर पुन्हा विश्वास ठेवणाऱ्या मातीतून उगवलेल्या परिवर्तनाची नवी चाहूल आहे.
Comments are closed.