गडचिरोलीत उपजिविकेचा नवा सूर्योदय : ‘बाएफ’च्या माध्यमातून एटापल्लीतील २० गावांमध्ये शाश्वत रोजगाराकडे वाटचाल
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली/मुंबई, दि. २४ जुलै : आदिवासी भागातील जीवनमान उंचावण्यासाठी सरकार, खाजगी क्षेत्र आणि समुदाय यांच्यातील समन्वयातून उपजिविका विकासाचे आशादायी मॉडेल साकार होत असून, गडचिरोलीच्या एटापल्ली तालुक्यातील वीस गावांत बाएफ संस्थेमार्फत सुरू झालेल्या ‘समन्वित उपजिविका विकास कार्यक्रमा’ने ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवे बळ मिळाले आहे. “या भागातील युवक व महिलांना स्थानिक पातळीवरच रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असून, आर्थिक सबलीकरणाच्या दिशेने ठोस पावले उचलली जात आहेत,” असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
मुख्यमंत्र्यांच्या पुढाकारातून व ‘एसबीआय फाउंडेशन’च्या प्रायोजकत्वाखाली बाएफ संस्थेमार्फत एप्रिल २०२५ पासून सुरू झालेला हा प्रकल्प पुढील तीन वर्षांत १,५०० आदिवासी कुटुंबांच्या जीवनात अमूलाग्र बदल घडवून आणणार आहे. एकूण ₹४.९५ कोटींच्या निधीच्या माध्यमातून या उपक्रमात हवामान सुसंगत व शाश्वत शेती, बोडी-आधारित शेती प्रणाली, मृदा व जलसंधारण, जलस्रोत विकास, मत्स्यपालन, महिला उद्योजकता, संस्थात्मक विकास, पोषण व स्वच्छता यांचा समावेश आहे.
सद्यस्थितीत ५०० कुटुंबांची नोंदणी पूर्ण झाली असून, १५ बोडी (नैसर्गिक तळे) गाळमुक्त करण्यात आली आहेत. या बोडींमुळे शेतीसाठी पाणीसाठा वाढला असून, मत्स्यपालन आणि बोडीवर कुक्कुटपालनाच्या माध्यमातून पर्यायी उत्पन्नाचे स्रोत विकसित होत आहेत. बोडीतील जलसाठा शेतीसाठी वापरल्यामुळे पाण्याचा कार्यक्षम वापर होत आहे आणि शेती अधिक फलद्रूप होत आहे.
या उपक्रमामुळे स्थानिक शेती उत्पादनात वाढ होऊन शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे उद्दिष्ट २०२७-२८ पर्यंत साध्य होणार आहे. सामूहिक खरेदी-विक्री व्यवस्थेद्वारे बाजारात थेट प्रवेश मिळेल, तर पोषण व आरोग्य जनजागृतीमुळे संपूर्ण समुदायाच्या जीवनशैलीत लक्षणीय सकारात्मक बदल घडून येणार आहे. महिला बचतगट, युवक मंडळे, आरोग्य स्वयंसेवक अशा विविध घटकांना या उपक्रमातून सक्षम बनवले जात आहे.
या संपूर्ण प्रक्रियेचे वैशिष्ट्य म्हणजे, ही योजना केवळ शासकीय निर्णयांपुरती मर्यादित न राहता प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या, महिलांच्या आणि स्थानिक संस्थांच्या सहभागातून जिवंत राहते आहे. त्यामुळे ही योजना ‘शासन–समाज–संस्था’ या त्रिसूत्रीचे प्रभावी उदाहरण बनली आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी विशेषतः या आदिवासी भागातील लोककल्याणासाठी स्वयंसेवी संस्था, CSR फाउंडेशन आणि प्रशासन यांचे त्रिसूत्री सहकार्य आवश्यक असल्याचा पुनरुच्चार केला आहे. त्यांच्या पाठपुराव्यामुळेच या प्रकल्पाला हवी ती दिशा मिळाली असून, बाएफ संस्थेच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीमुळे त्याचे मूर्तस्वरूप गडचिरोलीच्या मातीत आकार घेत आहे.
Comments are closed.