अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू
चंद्रपूर-गोंडपिपरी राष्ट्रीय महामार्गावर आक्सापूर गावाजवळील रस्त्यावर ची हृदयद्रावक घटना ..
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
चंद्रपूर, २७ जुलै : एकेकाळी गोंडवनातील जंगलांचा राजा समजला जाणारा बिबट्या आज सकाळी एका भरधाव वाहनाच्या धडकेत शिकार झाला. चंद्रपूर-गोंडपिपरी राष्ट्रीय महामार्गावर आक्सापूर गावाजवळील रस्त्यावर ही हृदयद्रावक घटना घडली. भरधाव वेगाने जाणाऱ्या अज्ञात वाहनाने बिबट्याला जोरदार धडक दिली आणि तो जागीच मृत झाला. रस्त्यावर निपचित पडलेले ते भव्य, पण शांत देहाचे दृश्य पाहून वनप्रेमी सुन्न झाले.
घटनेची माहिती मिळताच गोंडपिपरी वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. बिबट्याच्या मृतदेहाची वनविभागाने पंचनामा प्रक्रिया करून शवविच्छेदनासाठी ताब्यात घेतले. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. बिबट्याचा मृत्यू ही केवळ एका प्राण्याची हानी नाही, तर निसर्गाच्या समतोलावर घातलेली आणखी एक ओरखडी आहे.
गोंडपिपरी, चंद्रपूर आणि बल्लारपूर परिसरातील वन्यजीवप्रेमींमध्ये संताप आणि दुःख यांचं वातावरण असून, त्यांनी राष्ट्रीय महामार्गांवरून जाणाऱ्या जंगल मार्गांमध्ये वन्यप्राण्यांच्या सुरक्षिततेसाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. अनेक वर्षांपासून बिबट्या, वाघ, अस्वल, आणि सांबरसारखे प्राणी महामार्ग ओलांडताना अपघातांमध्ये जीव गमावत आहेत, परंतु अजूनही संरक्षित भिंती, अंडरपास वा चेतावणी यंत्रणा पुरेश्या नाहीत.
या दुर्दैवी घटनेचा सखोल तपास वनविभागाकडून सुरू असून, सीसीटीव्ही फुटेज व वाहन क्रमांकाचा माग काढण्याचे कामही सुरू आहे. मात्र याआधीही अशा कित्येक घटना ‘गुन्हेगार वाहन’ अज्ञात राहूनच संपल्या आहेत.
सिरोंचा ग्रामीण रुग्णालय: रुग्णालयाची ‘अस्वस्थ’ स्थिती, रुग्णांची सीमापार धाव


Comments are closed.